Trump Suspends Project Freedom: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. इराणबरोबर सुरु असलेल्या युद्ध समाप्तीबाबतच्या वाटाघाटी पुढे सरकल्या असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. शिवाय, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना संरक्षण देणारा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ट्रम्प यांनी स्थगित केला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये, इराणच्या प्रतिनिधींसोबत अंतिम कराराच्या दिशेने प्रगती झाली असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांची ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट
“पाकिस्तान आणि इतर देशांनी केलेल्या विनंतीनंतर आमच्या इराणविरोधातील लष्करी प्रयत्नांना यश मिळाले आहे”, असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण आणि अंतिम करार करण्याच्या दिशेने इराणच्या प्रतिनिधींसोबत सुरु असणारी चर्चा पुढे सरकली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम राहील यासाठी दोघांनी संमती दर्शवली आहे. दरम्यान, अंतिम करारावर स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना संरक्षण देणारा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात येत आहे”, असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.
प्रोजेक्ट फ्रीडम
अमेरिकेने युद्धविराम जाहीर केला मात्र, इराणची आर्थिक कोंडी करुन दबाव वाढविण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला सुरुवात केली. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखण्यास सुरुवात केली. दरम्यान, रविवारी अमेरिकेने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची घोषणा केली. या प्रोजेक्टच्या माध्यमातून अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनी पार करण्यासाठी जहाजांना संरक्षण देण्यास सुरुवात केली. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या जहाजांना अमेरिकेच्या संरक्षण दलाने सुरक्षा पुरवली, या मोहिमेला आता तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय.
इराणला करायचाय करार – ट्रम्प
“इराणला आमच्याबरोबर करार करायचा आहे. इराणी प्रतिनिधी आणि आमच्यात चर्चा सुरु आहे. पण, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा झाल्याचा दावा ते वारंवार फेटाळत आहेत. त्यांच्याकडून केवळ खेळ मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असे डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले.
उद्ध्वस्त इराण
“इराणचे क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि रॉकेटचे पारंपरिक संरक्षण कवच उद्ध्वस्त झाले आहे. इराणची हवाई दल उद्ध्वस्त झाले आहे. इराणला अण्वस्त्र कार्यक्रमाचे काम सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असणारे संरक्षण कवच पूर्णपणे नष्ट झाले आहे. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’चा हाच उद्देश होता आणि तो साध्य झाला आहे. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ समाप्त झाले आहे,” असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो म्हणाले.
रुबियो यांनी स्पष्ट केली भूमिका
पोजेक्ट फ्रीडमबाबत बोलताना त्यांनी अमेरिकेचा उद्देश स्पष्ट केला. “पर्शियन गल्फमध्ये जवळपास ८७ देशांचे २३,००० नागरिक अडकून पडले आहेत. इराणच्या नेतृत्वाने या नागरिकांना मरणाच्या दारात उभं केलं आहे. हे हिंसक ऑपरेशन नसून, संरक्षणात्मक मोहीम आहे. आमच्यावर हल्ला झाला तरच त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. पण, त्यांच्याकडून आमच्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. त्यामुळे याला उत्तर देणे आमला भाग पडते”, असे मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले.
