Iran Opens Strait of Hormuz: गेल्या दीड महिन्यांपासून बंद असणारी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. “युद्धविरामाच्या उर्वरीत काळात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असेल”, अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी केली आहे. सर्व व्यावसायिक जहाजांसाठी सामुद्रधुनी खुली असेल, असे मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले आहे. इराणच्या या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील स्वागत केले आहे. त्यांनी ‘थँक यू इराण’, अशी पोस्ट ट्रुथ सोशलवर केली आहे.

ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार

लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगाने इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतल्याचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले. इराणच्या या घोषणेमुळे भारतासह जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर याबाबत पोस्ट करुन इराणचे आभार मानले आहेत.

परराष्ट्रमंत्री अराघची काय म्हणाले?

“लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगाने, इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाच्या बंदरे आणि सागरी संघटनेने जाहीर केलेल्या मार्गावरून, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांसाठी युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी मार्ग पूर्णपणे खुला करण्यात आला आहे”, असे अराघची यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय पोस्ट केली आहे?

“होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. धन्यवाद!”, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात आल्याची माहिती देत इराणचे आभार मानले.

इस्रायल आणि लेबनॉन १० दिवसांच्या युद्धविराम

इस्रायल आणि लेबनॉन १० दिवसांच्या युद्धविरामावर सहमत झाल्याचे ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री घोषणा केली. ट्रम्प यांच्या निवेदनात लेबनॉनस्थित इराण-समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहचा कोणताही उल्लेख नव्हता. पण, नंतर ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी या गटाला युद्धविरामाचा आदर करण्याचे आवाहन केले. “मला आशा आहे की या महत्त्वाच्या काळात हिजबुल्लाह समंजसपणे वागेल,” असे ट्रम्प म्हणाले होते.