Trump Iran Truth Social Post: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकलेल्या युद्धविरामामुळे थांबला असला तरी, होर्मुझ सामुद्रधुनीमुळे अद्याप जगासमोर इंधन आणि गॅस तुटवड्याचे संकट कायम आहे. होर्मुझबाबत इराण आणि अमेरिकेची भूमिका देखील ठाम असल्याने यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. होर्मुझमध्ये अमेरिकेने नाकेबंदी केल्याने येथून होणाऱ्या जहाज वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. शिवाय इराण देखील होर्मुझ पूर्णपणे खुली करण्यास तयार नाही. दरम्यान, आता होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाची अपडेट दिली आहे.

इराण कोलमडण्याच्या अवस्थेत – ट्रम्प

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यास अमेरिकेला सांगितले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराण सध्या पूर्णपणे कोलमडण्याच्या अवस्थेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर याबाबत एक पोस्ट केली असून, इराणने पाठवलेल्या संदेशाची माहिती त्यांनी या पोस्टमधून दिली आहे. इराणने धमकीच्या छायेखाली होर्मुझ खुली करण्यास विरोध दर्शवला होता. यानंतर अमेरिका देखील नाकेबंदी कायम ठेवेल, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतल्याने होर्मझचा पेच अधिक वाढला आहे.

ट्रम्प यांची पोस्ट काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टनुसार इराणने त्यांना होर्मुझ खुली करण्याबाबत बोलणी केल्याचे समजते. “इराणने आत्ताच आम्हाला कळवले की ते पूर्ण कोलमडण्याच्या अवस्थेत आहेत. लवकरात लवकर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास त्यांनी सांगितले आहे. नेतृत्वाचा मुद्दा सोडविण्याचा ते सध्या प्रयत्न करत आहेत (मला वाटतंय ते त्यांना जमेल)”, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

इराणच्या प्रस्तावावर अजून निर्णय नाही

अ‍ॅक्सिओसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इराणने दिलेल्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षा विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना सविस्त माहिती दिली. पण, या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. इराणचा प्रस्ताव मान्य करण्याच्या बाजूने ट्रम्प नसल्याचे अ‍ॅक्सिओसच्या वृत्तात म्हटले आहे. अण्वस्त्र कार्यक्रमावरुन दोन्ही देशातील चर्चा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणची रशिया भेट

इराणने आता चर्चेसाठी स्वत: पुढाकार घ्यावा, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या चर्चेची फेरी होऊ न शकल्याने इराणला कळवले आहे. तसेच, इराण दीर्घकालिन उपाय काढण्यासाठी अधिकचा वेळ मागत आहे. पाकिस्तानने देखील अमेरिकेला यासाठी युद्धविराम वाढविण्याची विनंती केली. इराणी नेत्यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. पुतिन यांनी या संघर्षात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.