Trump Greenland Military Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्क आणि ग्रीनलँडसोबत एका ऐतिहासिक कराराची घोषणा केली आहे. यामुळे ग्रीनलँडमधील सुरक्षा आणि इतर गरजांवर अमेरिकेला कायमस्वरूपी नियंत्रण मिळणार आहे. शुक्रवारी ट्रुथ सोशल पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, हा करार ग्रीनलँड आणि अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याची क्षमता अमेरिकेला कायमस्वरुपी देतो. त्यांनी असंही स्पष्ट केलं की, अमेरिकेच्या मंजुरीशिवाय कोणत्याही शत्रू देशाला ग्रीनलँडमध्ये लष्करी तळ ठोकण्यास, उपस्थिती दर्शवण्यास किंवा संवेदनशील गुंतवणूक करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
ट्रम्प यांनी सांगितलं की, अमेरिका तात्काळ ग्रीनलँडच्या योग्य भागात मोठ्या प्रमाणावर लष्करी उपस्थिती वाढवण्यास सुरुवात करेल आणि विकास व बांधकामासाठी ग्रीनलँडच्या जनतेसोबत काम करेल.
डेन्मार्क आणि ग्रीनलँडकडून कराराला दुजोरा
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्या कार्यालयाने सांगितलं की, आर्क्टिक आणि उत्तर अटलांटिक क्षेत्रातील सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने ग्रीनलँड, डेन्मार्क आणि अमेरिका पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही देश या करारावर स्वाक्षरी करतील. स्वाक्षरी झाल्यानंतर, हा करार लागू होण्यापूर्वी आवश्यक त्या संसदीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.
ग्रीनलँडचे प्रीमियर जेन्स-फ्रेडरिक नील्सन म्हणाले की, “या करारामुळे ग्रीनलँड, डेन्मार्क, अमेरिका आणि पाश्चात्य आघाडीची सुरक्षा मजबूत होईल. हा करार ग्रीनलँडचे हित आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातील त्याचे स्थान मान्य करतो.” पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी देखील नमूद केलं की, हा करार डेन्मार्कचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता कायम ठेवून सामायिक सुरक्षा मजबूत करेल, ज्यामुळे नाटो आणि युरोपला फायदा होईल. तसंच, हा करार “ग्रीनलँडच्या जनतेच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचा आदर करतो.
सार्वभौमत्व हस्तांतरित न करता अमेरिकेला लष्करी प्रवेश मिळणार
फॉक्स न्यूज डिजिटलने दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अमेरिकेतील अधिकाऱ्याने सांगितलं की, या करारामुळे वॉशिंग्टनला ग्रीनलँडमध्ये कायमस्वरूपी प्रवेश, लष्करी तळ आणि विमानांच्या उड्डाणाचे अधिकार मिळतील, तसंच आवश्यकतेनुसार अतिरिक्त लष्करी तळ स्थापन करण्याची क्षमता मिळेल. हा करार चीन, रशिया आणि इतर बिगर-नाटो देशांना ग्रीनलँडमध्ये लष्करी तळ उभारण्यास किंवा सैन्य ठेवण्यास बंदी घालतो. शत्रू देशांना दूरसंचार पायाभूत सुविधा, समुद्राखालील केबल्स, बंदरे आणि महत्त्वपूर्ण खनिजे यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रतिबंध केला जाईल.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या कराराचं वर्णन अमेरिकेच्या सुरक्षेचा मोठा विजय असं केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, या करारामुळे ग्रीनलँडचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे हस्तांतरित होत नाही; ग्रीनलँड डेन्मार्कच्याच सार्वभौमत्वाखाली राहील. या कराराला कोणतीही कालमर्यादा नाही आणि भविष्यात ग्रीनलँड स्वतंत्र झाला तरीही हा करार लागू राहील अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे.
अमेरिका आधीपासूनच उत्तर ग्रीनलँडमध्ये ‘पिटुफिक स्पेस बेस’ चालवत आहे. नव्या करारानुसार, अतिरिक्त लष्करी तळांबाबत डेन्मार्क आणि ग्रीनलँडशी सल्लामसलत केली जाईल, परंतु त्यांच्याकडे मंजुरी देण्याचा अंतिम अधिकार नसेल.
