US Iran Peace Deal MOU Signed Online: अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीचा ऐतिहासिक करार झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. जवळपास चार महिन्यांच्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर ऑनलाईन पद्धतीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्रध्यक्ष जे. डी. व्हॅन्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी या मसुद्यावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिली आहे.

शुक्रवारी करारावर होणार स्वाक्षरी

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणमधील महत्वपूर्ण कराराचा औपचारिक स्वाक्षरी सोहळा येत्या शुक्रवारी पार पडणार आहे. तर, पुढील ४८ तासांत या कराराचा सविस्तर तपशील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा करार अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. करारात अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजूनही चर्चा होणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘रॉयटर्स’ला माहिती देताना सांगितले. पण, या करारामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यास मदत होईल, असे अमेरिकन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार

अमेरिका आणि इराण यांच्यातील करार होण्यासाठी पाकिस्तानने महत्वाची भूमिका बजावली आहे. जगभरातून उभय देशांत झालेल्या करारावरील एकमताचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या कराराचे स्वागत केले. दरम्यान, दोन्ही देशांनी या प्राथमिक कराराला मान्यता दिली असली, तरी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत भविष्यात स्वतंत्रपणे चर्चा सुरू राहणार आहे. करारामुळे मिळणारा सर्वात मोठा दिलासा म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सागरी वाहतूक हळूहळू पूर्ववत होणार आहे. जागतिक व्यापार, इंधन आणि गॅस वाहतुकीसाठी याचा फायदा होणार आहे.

इराणचा निधी मुक्त होणार?

​होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबात बोलताना अमेरिकन अधिकाऱ्याने, “पुढील दोन आठवड्यांत सर्व काही पूर्णपणे सामान्य होणार नाही, परंतु वाहतुकीत मोठी वाढ नक्कीच पाहायला मिळेल,” असे सांगितले. ​या कराराचा भाग म्हणून अमेरिका इराणचा जप्त केलेला निधी मुक्त करण्यास आणि काही निर्बंधांमधून सूट देण्यास तयार आहे.