अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेले युद्ध ८ एप्रिल रोजी थांबले. या युद्धबंदीमागे पाकिस्तानची मध्यस्थी कारणीभूत असल्याचा खुलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘एअर फोर्स वन’ विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणसोबत युद्धबंदी करण्याची त्यांची इच्छा नव्हती, परंतु पाकिस्तानचा शब्द राखण्यासाठी आणि त्यांच्यावर एकप्रकारे उपकार म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फील्ड मार्शल यांचे कौतुक केले असून इराणला अण्वस्त्र तयार करू न देण्याचा इशारा दिला आहे.

‘मी याच्या बाजूने नव्हतो, परंतु आम्ही पाकिस्तानवर उपकार म्हणून हे केले’ – ट्रम्प

इराणसोबत करण्यात आलेल्या युद्धबंदीमागे पाकिस्तानची मध्यस्थी कारणीभूत असल्याचा खुलासा ट्रम्प यांनी केला आहे. “इराणसोबत युद्धबंदी करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण पाकिस्तानचा शब्द राखण्यासाठी आणि त्यांच्यावर एकप्रकारे उपकार म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला,” असा खळबळजनक खुलासा ट्रम्प यांनी केला आहे. यासोबतच, इराणवर आता नव्याने कोणताही बॉम्बहल्ला केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत ट्रम्प यांनी आखातातील तणाव काहीसा कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

‘पाकिस्तानचे पंतप्रधान अन् फील्ड मार्शल खूप चांगले लोक’

चीनचा दौरा आटोपून अमेरिकेकडे परतत असताना ट्रम्प यांनी ‘एअर फोर्स वन’ या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत विमानात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प म्हणाले- “आम्ही केवळ एका दुसऱ्या देशाच्या विनंतीचा मान ठेवून ही युद्धबंदी मान्य केली आहे. खरं तर मी या निर्णयाच्या बाजूने नव्हतो, पण पाकिस्तानवर उपकार म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फील्ड मार्शल हे दोघेही अत्यंत उत्तम व्यक्ती आहेत.” अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारी रोजी थेट युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्यानंतर, ८ एप्रिलपासून हे हल्ले थांबवण्यात आले होते.

इराणच्या अण्वस्त्रांवर ट्रम्प आक्रमक

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. “इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र तयार करू दिली जाणार नाहीत. तेहरानने (इराणची राजधानी) युरेनियमचा नाद सोडला पाहिजे,” असा सज्जड दम ट्रम्प यांनी दिला. इराणने पाठवलेला शांतता प्रस्ताव आपण पहिल्याच वाक्यात फेटाळून लावल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. आपला अणू कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याबाबत इराणने या प्रस्तावात कोणतीही ठोस हमी दिली नव्हती, त्यामुळे अमेरिकेने हा प्रस्ताव नाकारला.

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात ‘इराण’वर काय चर्चा झाली?

इराणसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या या संघर्षामुळे ट्रम्प काहीसे राजकीय दबावात असतानाच चीन दौऱ्यावर गेले होते. मात्र, चीनकडून इराणच्या मुद्द्यावर कोणताही मोठा तोडगा काढण्यात त्यांना यश आले नाही. बीजिंगमधील ‘झोंगनानहाई गार्डन’ येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही इराणच्या समस्येवर सविस्तर चर्चा केली. या समस्येचा कसा तोडगा काढायचा, याबाबत आमच्या दोघांचे विचार बरेच सारखे आहेत. इराणकडे अण्वस्त्रे नसावीत आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची सामुद्रधुनी – जागतिक तेल व्यापाराचा मुख्य सागरी मार्ग) वाहतुकीसाठी खुली राहावी, यावर आमचे एकमत आहे.”

“इराणच्या मुद्द्यावर आम्हाला चीनच्या मदतीची गरज नाही” – ट्रम्प

गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका इराणला समजवण्यासाठी चीनने पुढाकार घ्यावा म्हणून दबाव टाकत होती. मात्र, आता ट्रम्प यांच्या सुरात बदल पाहायला मिळत आहे. “मला वाटत नाही की इराणच्या प्रकरणात आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज आहे. अमेरिका हा संघर्ष कोणत्याही परिस्थितीत जिंकेलच,” असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

अमेरिकेवर आमचा अजिबात विश्वास नाही: इराण

दुसऱ्या बाजूला, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “इराणचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. जर अमेरिकेला गंभीर चर्चा करायची असेल, तरच इराण चर्चेसाठी तयार होईल,” असे अरागची यांनी स्पष्ट केले. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आलेले अरागची पत्रकारांशी बोलत होते. मुत्सद्देगिरी आणि चर्चेला एक संधी मिळावी म्हणूनच इराण सध्या युद्धबंदीचे पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.