Trump Iran Warning: US President Donald Trump issues a stern military warning amid the ongoing ceasefire talks : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर एकमत झाले आहे, यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पुन्हा एकदा इराणला गंभीर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य इराणमध्ये आणि आजूबाजूला तैनात राहील, असे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

“जोपर्यंत ‘खऱ्या करारा’चे (REAL AGREEMENT) पूर्णपणे पालन केले जात नाही, तोपर्यंत अमेरिकेची सर्व जहाजे, विमाने आणि लष्करी अधिकारी, तसेच अधिकचा दारुगोळा, शस्त्रास्त्रे, आणि आधीच मोठ्या प्रमाणात कमकुवत झालेल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी योग्य आणि आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इराणमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला तैनात राहतील, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर केली आहे.

या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणला आठवण करून दिली की, त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी ही पुर्णपणे उघडली जाईल आणि कराराच्या अटीचा भाग म्हणून इराण कोणतेही अण्वस्त्र तयार करणार नाही, असे वचन दिले होते. तसेच ट्रम्प यांनी सूचित केले की, या अटींचे उल्लंघन झाले तर अमेरिकेकडून प्रचंड मोठा आणि यापूर्वी कधीही झाला नाही असा हल्ला केला जाऊ शकतो.

“जर कोणत्यातरी कारणाने तो (अंतिम करार) झाला नाही , ज्याची शक्यता तशी खूपच कमी आहे, तर गोळीबार सुरू होईल, जो आजवर कधीही पाहिला नसेल इतका मोठा, अधिक प्रभावी आणि अधिक तीव्र असेल,” असेही ट्रम्प पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

युद्धविरामानंतरही तणाव कायम

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला असला तरी मध्यपूर्वेतील तणव अद्याप कमी झालेला नाही. महिनाभरापेक्षा जास्त काळ संघर्ष चालल्यानंतर युद्धविरामावर सहमती झाली आहे. यानंतर इस्रायलने लेबनॉनमध्ये हेझबोलाच्या ऑपरेटीव्हजवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हेझबोला हा युद्धविरामाच्या कराराचा भाग नव्हता असा दावा केला आहे. इस्रायलने केलेल्या या हवाई हल्ल्यात बुधवारपासून २५० हून अधिक लोकांचा मृ्त्यू झाला आहे.

“इराणबरोबरच्या युद्धविरामात हेझबोलाचा समावेश नसेल आणि इस्रायल त्यांच्यावर हल्ले करणे सुरूच ठेवेल,” असे ते म्हणाले. यातून त्यांनी हे संकेत दिले आहेत की लेबनॉनशी संबंधित असलेल्या या गटाविरोधात इस्रायलची लष्करी मोहीम सुरूच राहील.

पाकिस्तानमध्ये चर्चा

युद्धविरामानंतर इराणशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाणार आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिली आहे. चर्चेची पहिली फेरी शनिवारी पार पडेल असे त्यांनी सांगितले. व्हान्स यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जारेड कुश्नर यांचाही समावेश असेल. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर कालिबाफ आणि परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांच्याकडे असेल.