Trump US Navy Strait of Hormuz blockade begins as F-35B jets and 15 warships deploy : अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती आणि किनारपट्टीच्या भागात सागरी नाकेबंदी करण्यासाठी १५ पेक्षा जास्त युद्धनौका तैनात केल्या आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून ‘यूएसएस त्रिपोली’ (USS Tripoli LHA 7) ही युद्धनौका अरबी समुद्रात ‘F-35B लायटनिंग II’ स्टेल्थ फायटर जेट्स आणि ‘MV-22 ऑस्प्रे’ विमानांसह तैनात आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी सुरू झाली असल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे. अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातासह इराणच्या बंदरांमध्ये येणाऱ्या किंवा तेथून जाणाऱ्या सर्व जहाजांवर कोणताही भेदभाव न करता ही कारवाई केली जाईल. दरम्यान, इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जाण्यास अडवले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, “यूएसएस त्रिपोली अरबी समुद्रात रात्रीच्या वेळी उड्डाण मोहीम राबवत आहे. या युद्धनौकेची रचना अशा प्रकारे केली आहे की तिथे जास्तीत जास्त F-35B स्टेल्थ फायटर, ऑस्प्रे आणि हेलिकॉप्टर राहू शकतात. गरजेनुसार ही नौका २० हून अधिक F-35B विमानांना एकाच वेळी हाताळू शकते.”

आता फास्ट अटॅक बोटींना लक्ष्य करू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, नाकेबंदीच्या जवळ येणाऱ्या इराणच्या कोणत्याही ‘फास्ट-अटॅक’ नौका नष्ट केल्या जातील. त्यांनी दावा केला की, इराणच्या नौदलाचा मोठा हिस्सा युद्धात आधीच नष्ट झाला आहे. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इराणचे नौदल समुद्राच्या तळाशी पडले आहे, त्यांची १५८ जहाजे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आम्ही त्यांच्या ‘फास्ट अटॅक’ बोटींना आतापर्यंत लक्ष्य केले नव्हते कारण त्या आम्हाला मोठा धोका वाटत नव्हत्या. पण सावधान: जर यापैकी कोणतीही बोट आमच्या नाकेबंदीच्या जवळ आली, तर त्यांना तात्काळ संपवले जाईल. आम्ही ज्याप्रमाणे समुद्रातील ड्रग तस्करांचा खात्मा करतो, अगदी तशीच ही कारवाई वेगवान आणि भीषण असेल. समुद्रातून अमेरिकेत येणारी ९८.२% अंमली द्रव्ये आता थांबली आहेत.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथवर केलेली पोस्ट

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पाकिस्तानमधील चर्चेनंतर परतल्यानंतर ही नाकेबंदी जाहीर करण्यात आली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या हल्ल्यांनंतर सुरू झालेले युद्ध संपवण्यासाठी कोणताही करार होऊ शकला नाही.

ट्रम्प यांनी रविवारीच या नाकेबंदीची घोषणा केली होती. अमेरिकन लष्कराने आधीच स्पष्ट केले होते की, इराणच्या बंदरांवर येणाऱ्या किंवा तिथून निघणाऱ्या सर्व जहाजांना हा नियम लागू असेल. विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी पूर्ण करण्यासाठी गेल्या बुधवारी दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य झाला असतानाही हे पाऊल उचलण्यात आले आहे.