Donald Trump on Iran Peace Deal To End War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी उशीरा इराणशी करार अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं. त्यामुळे लवकरच युद्धसमाप्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, करारावर अंतिम स्वाक्षरी करण्यासाठी आपण स्वत: पाकिस्तानला जाणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून जगभरात चिंता वाढवणारं अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध लवकरच संपण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पाकिस्तानमध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता दुसऱ्या फेरीमध्ये युद्धसमाप्तीच्या दिशेनं ठोस कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे.

इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकेतील स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते पाकिस्तानला जाण्याचा उल्लेख केला आहे. “आम्ही इराणशी युद्धसमाप्तीसंदर्भातला करार अंतिम करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. हा करार अंतिम स्वरूप घेण्याची पूर्ण शक्यता आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच, “इराणशी कराराचं स्वरूप अंतिम झालं तर मी पाकिस्तानला जाईन”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केलं.

“इराणनं महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे. त्यात त्यांच्या अणुकार्यक्रमाचाही समावेश आहे. इराणकडे कधीच अण्वस्त्र तयार होणार नाही, याची आम्हाला खातरजमा करायची होती. त्यांनी जवळपास सगळ्याच अटींना सहमती दर्शवली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, एकीकडे डोनाल्ड ट्रम्प इराणनं सर्वकाही मान्य केल्याचा दावा करत असले, तरी खुद्द इराणकडून मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे युद्धसमाप्तीसंदर्भातल्या दाव्यांबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

इराण युरेनियमचा साठा अमेरिकेला देणार?

दरम्यान, यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला असून इराण आपला युरेनियमचा साठा अमेरिकेला देणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे इराणनं युद्धसमाप्तीच्या बदल्यात नेमक्या कोणत्या अटींना मान्यता दिली आहे, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. युरेनियमचा साठा अमेरिकेला न देण्याबाबत इराणनं सुरुवातीपासून आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामुळे आता नव्या वाटाघाटींमधून काय समोर येतं, त्यावर या कराराचं भवितव्य अवलंबून असेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पाकिस्तानचं कौतुक

एकीकडे इराणशी करार अंतिम टप्प्यात आल्याचं सांगतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचं व पाकिस्तानच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. “पाकिस्तानचे फील्ड मार्शल (लष्करप्रमुख असीम मुनीर) हे खूप चांगले व्यक्ती आहेत. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधानही (शाहबाज शरीफ) खूपच चांगले आहेत. त्यामुळे मी कदाचित पाकिस्तानमध्ये जाईन”, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

याआधी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले होते. इस्लामाबादमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर ते अमेरिकेला रिकाम्या हातांनीच परतले होते. त्यानंतरदेखील दोन्ही देशांमध्ये इराणचा अणुकार्यक्रम आणि त्यावरील प्रस्तावित निर्बंध यावर चर्चा करत होते. इराणमधील युरेनियमच्या साठ्यांबाबतच्या निर्णयाबरोबरच दोन्ही बाजूंनी तणाव अधिक न वाढण्याबाबतही चर्चा चालू आहे.