अमेरिका व इराण यांच्यात युद्ध समाप्तीसाठीचा करार लवकरच होणार असल्याची चिन्हे दिसत असताना एक मोठी अडचण समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणकडे असलेला समृद्ध युरेनियमचा साठा हवा आहे. युरेनियमचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. इराणने युरेनियमचा साठा कोसळलेल्या खाणी व बोगद्यांखाली दडवून ठेवल्याचे समोर आले आहे. इराणने खाणी, बोगद्यांमध्ये असलेला युरेनियमचा साठा जमिनीखाली लपवून ठेवला व त्यानंतर खाणी व बोगद्यांना हेतुपुरस्सरपणे उद्ध्वस्त केले. तसेच त्याच्या प्रवेशद्वारांवर भू सुरूंग पेरले आहेत, अशी माहिती समोर आली. CNN या वृत्तसंस्थेने अमेरिकन गुप्तचर यंत्रणेशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

युरेनियम साठा इराणने लपवला आहे का?

जवळपास अर्धा टन समृद्ध युरेनियम इराणने लपवले आहे. इराणने लपवलेले युरेनियम अत्यंत समृद्ध असून त्यापासून अणुबॉम्ब सहजपणे बनवता येतो. यांपैकी बहुतांश युरेनियम मध्य इराणमधील इस्फहान येथील उद्ध्वस्त झालेल्या बोगद्यांखाली दडवण्यात आले आहे. तर इतर युरेनियम हे इतरत्र ठिकाणी ठेवण्यात आले. याचा अर्थ युरेनियम जमिनीतून बाहेर काढण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात खोदकाम हाती घ्यावे लागू शकते. लपवलेले युरेनियम बाहेर काढणे हे इराणसाठी देखील मोठे आव्हान ठरणार आहे, अशी माहिती अमेरिकेच्या ‘यूएस नॅशनल न्युक्लिअर सेक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिस ऑफ न्यूक्लिअर मटेरिअल रिमूव्हल’चे माजी अध्यक्ष स्कॉट रॉकेर यांनी CNN ला दिली आहे.

इराणजवळील युरेनियमचा प्रश्न सुटणे का महत्त्वाचे?

इराणकडे असलेला युरेनियमचा साठा हा अमेरिका व इराण यांच्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असून त्यावरच दोन्ही देशांतील युद्धसमाप्तीचा करार अवलंबून असल्याचे मानले जाते. अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी माध्यमांना सांगितले, इराण त्याच्याजवळ असलेला युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सोपवेल यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले आहे. इराणमधून बाहेर नेण्यापूर्वी युरेनियम असलेल्या ठिकाणांवरच नष्ट केले जाईल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

करार झाला तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम राहणार?

अमेरिका व इराण यांच्यात युरेनियम हस्तांतरणाचा करार झाला तर इराण अमेरिकेला सर्व युरेनियम साठा सोपवेल याची शक्यता कमी आहे. युरेनियम साठ्याचा काही भाग इराण अमेरिकेला देईल व उर्वरित भाग आपल्याजवळ नसल्याचे सांगेल, अशी शक्यता स्कॉर रॉकेर यांनी व्यक्त केली आहे. इराणने जर अशी भूमिका घेतली तर आता करार झाल्यानंतरही दोन्ही देशांमध्ये भविष्यात युरेनियमवरून वादविवाद सुरूच राहतील. उर्वरित युरेनियम साठा खाणींच्या खाली दबला गेल्याचे इराणने सांगितले तरी त्या साठ्यापर्यंत इराण पोहोचेल. सरतेशेवटी तो साठा इराणकडेच असेल, अशी शक्यता स्कॉट रॉकेर यांनी व्यक्त केली आहे.