Trump warns China of big problems regarding Iran air defence systems intent : चीनकडून इराणला शस्त्रास्त्र पुरवठा होत असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला स्पष्ट इशारा दिला आहे. जर त्यांनी इराणला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला तर त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील दोन आठवड्यांचा नाजूक युद्धविराम टिकणार नाही, अशी भीती व्यक्त होत असताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
व्हाईट हाऊसमधून मियामीला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “जर चीनने असे केले, तर चीनला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.” मात्र, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी याबाबत अधिक तपशील दिला नाही. ‘सीएनएन’च्या एका अहवालानंतर हा इशारा देण्यात आला आहे. या अहवालात अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणला येत्या काही आठवड्यांत चीनकडून नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळू शकते. बीजिंग या मालाची वाहतूक करण्यासाठी आणि मूळ स्त्रोत लपवण्यासाठी तिसऱ्या देशांचा वापर करत असल्याचे संकेतही अहवालात दिले आहेत.
इराण-अमेरिकेत लष्कर तैनात
अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरता युद्धविराम करार झालेला असतानाही ही घडामोड समोर आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रादेशिक परिसरात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात ठेवले आहेत. अमेरिकन युद्धनौका आणि सैन्य इराणजवळ तैनात आहे, तर अलीकडील अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये खराब झालेली आपली हवाई संरक्षण क्षमता इराण वेगाने पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाते.
चीनने आरोप फेटाळले
दरम्यान, चीनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, बीजिंगने “संघर्षातील कोणत्याही पक्षाला कधीही शस्त्रे पुरवलेली नाहीत” आणि अमेरिकेने “निराधार आरोप” आणि “सनसनाटी” पसरवणे थांबवावे, असे आवाहन केले आहे. इराणला चीनकडून मिळणारी कोणतीही लष्करी मदत वॉशिंग्टनकडून मोठी चिथावणी मानली जाऊ शकते. परिणामी पुढील महिन्यात ट्रम्प यांच्या नियोजित चीन दौऱ्यावर आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या चर्चेवर परिणाम होऊ शकतो.
पाश्चात्य देशांच्या कडक निर्बंधांचा सामना करणाऱ्या इराणसाठी चीन आणि रशिया हे सर्वात महत्त्वाचे धोरणात्मक आणि लष्करी भागीदार राहिले आहेत. त्यांना महत्त्वपूर्ण राजनैतिक आणि आर्थिक पाठबळ देतात.
