Donald Trump Warning to Iran : अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला एक महिना उलटून गेला बत आहे. तरीही युद्धसमाप्तीची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. युद्धग्रस्त देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत जात असून आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठा इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणला अल्टिमेटम दिला आहे.
अमेरिका उचलणार कठोर पावलं
ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका सध्या इराणमधील एका ‘नवीन आणि अधिक समजूतदार’ राजवटीशी लष्करी कारवाया थांबवण्याबाबत चर्चा करत आहे. यामध्ये मोठी प्रगती झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसंच, जर लवकरच कोणताही करार झाला नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी (Hormuz Strait) व्यापारासाठी त्वरित खुली केली गेली नाही, तर अमेरिका अत्यंत कठोर पाऊल उचलणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
खर्ग बेट, तेल विहिरी अन् वीज निर्मिती केंद्र उडवणार
करार न झाल्यास, इराणमधील सर्व वीज निर्मिती केंद्रे, तेल विहिरी आणि खर्ग बेट (Kharg Island) पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. इतकेच नाही तर देशातील पाणी शुद्धीकरण प्रकल्पही (Desalinization plants) लक्ष्य केले जाऊ शकतात, असे त्यांनी सुचवले आहे. आतापर्यंत या ठिकाणांना अमेरिकेने जाणीवपूर्वक हात लावला नव्हता, असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या ४७ वर्षांच्या जुन्या राजवटीत इराणने अमेरिकेचे सैनिक आणि इतर नागरिकांची जी हत्या केली, त्याचा हा सूड असेल, असे ट्रम्प यांनी नमूद केले आहे.
मध्य पूर्वेतील संघर्षाचा एक महिना पूर्ण झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनी सुरू झालेल्या या युद्धात ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी मालमत्ता तसेच शेजारील आखाती अरब देशांमधील इतर ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
दरम्यान, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या पकडीमुळे बाजारपेठा आणि किमती हादरल्या आहेत, कारण जागतिक तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार याच महत्त्वपूर्ण जलमार्गातून होतो. एपीच्या अहवालानुसार, आता इराण-समर्थित हौथी बंडखोरांच्या युद्धप्रवेशामुळे, तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या बाब अल-मंदेब सामुद्रधुनी या आणखी एका महत्त्वाच्या जलमार्गावरील जलवाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो.
