Donald Trump claims US knew nothing of Israeli strike on South Pars, warns Iran against hitting Qatar : इस्रायल इराणच्या महत्त्वाच्या ‘दक्षिण पार्स’ (South Pars) वायू क्षेत्रावर आता यापुढे हल्ले करणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले. त्याचवेळी, त्यांनी तेहरानला कतारच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य न करण्याबाबत इशारा दिला आहे. मध्यपूर्वेतील या ‘जशास तसे’ हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
इराणवरील हल्ल्यात अमेरिकेचा हात नाही
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टमध्ये म्हटले की, “मध्यपूर्वेतील घडामोडींचा राग म्हणून इस्रायलने इराणमधील ‘दक्षिण पार्स गॅस फील्ड’ या मोठ्या सुविधेवर जोरदार हल्ला चढवला आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या एका तुलनेने लहान भागाला यात लक्ष्य करण्यात आले आहे.” दक्षिण पार्सवरील या हल्ल्यांला अमेरिकेने इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेला या विशिष्ट हल्ल्याबद्दल काहीही माहिती नव्हती. तसेच कतारचा यात कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता किंवा त्यांना याची कल्पनाही नव्हती”, असे ट्रम्प यांनी नमूद केले.\
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा इशारा
इराणने आखाती देशांवर प्रत्युत्तर कारवाईची धमकी दिल्यानंतर ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे. ‘तस्नीम’ या निम-सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतारमधील पाच ऊर्जा केंद्रांना “येणाऱ्या काही तासांत लक्ष्य केले जाईल.” त्यानंतर लगेचच, इराणने गुरुवारी पहाटे कतारच्या ‘रास लफान इंडस्ट्रियल सिटी’वर क्षेपणास्त्र हल्ले केले. कतारच्या संरक्षण मंत्रालयानुसार, हे शहर देशातील मुख्य लिक्विफाइड नॅशनल गॅस (LNG) केंद्र आहे. कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या ठिकाणाला संघर्षादरम्यान वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. ट्रम्प म्हणाले, “दुर्दैवाने इराणला दक्षिण पार्स हल्ल्याशी संबंधित वस्तुस्थिती माहित नव्हती आणि त्यांनी अन्यायकारकपणे कतारच्या एलएनजी सुविधेवर हल्ला केला.”
…तर संपूर्ण दक्षिण पार्स गॅस फील्ड उडवून देऊ
अमेरिकन अध्यक्षांनी तेहरानला पुढील वाढत्या संघर्षाविरुद्ध इशारा दिला असून, जर अयातुल्ला राजवटीने कतारच्या ऊर्जा सुविधांवर हल्ले सुरूच ठेवले, तर संपूर्ण दक्षिण पार्स गॅस फील्ड “उडवून देण्याची” धमकी दिली आहे. त्यांनी पुढे लिहिले, “इराणने कतारवर हल्ला करण्याचा मूर्खपणा केला नाही, तर इस्रायलकडून दक्षिण पार्स क्षेत्रावर यापुढे कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत. पण तसे झाल्यास, अमेरिका इस्रायलच्या मदतीने किंवा मदतीशिवाय संपूर्ण दक्षिण पार्स गॅस फील्ड अशा शक्तीने उद्ध्वस्त करेल जी इराणने यापूर्वी कधीही पाहिली नसेल.”
