Trump warns Iran: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अमेरिकेचे लष्करी विमान पाडल्यानंतर दोन्ही देश आक्रमक झाले असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. “करार करण्यासाठी विलंब केला जात असल्याने आता इराणला किंमत मोजावी लागेल”, असे सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. तर, इराणवर पुन्हा नव्याने हल्ला करण्याचे आदेश देण्याच्या अतिशय जवळ असल्याचे त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
कराराला विलंब होत असल्याने ट्रम्प यांचा इराणाला इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली असून, त्यात इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. “इराणचे लष्कर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. विशेषत: त्यांचे नौदल आणि हवाई दल अस्तित्वातच नाही. त्यांचा पूर्णपणे पराभव झाला आहे. इराणच्या फक्त तोंडात दम असून, त्यांच्याकडून कारवाई होत नाही. त्यांच्या फायद्याचा असणारा करारा करण्यासाठी इराण खूप विलंब करत आहे. आता त्यांना याची किंमत मोजावी लागेल”, असा स्पष्ट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प हल्ल्याचे आदेश देण्याच्या जवळ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे अमेरिका -इराण संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड पुन्हा एकदा इराणविरोधात हल्ल्याचे आदेश देण्याच्या अगदी जवळ होते त्यांनी म्हटले आहे. अमेरिका इराणमधील उर्जा प्रकल्प, पूलांना या हल्ल्यामधून लक्ष्य करण्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे फॉक्स न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. एका पत्रकाराशी बोलताना ट्रम्प यांनी याबाबत खुलासा केल्याचे फॉक्सने म्हटले आहे.
अमेरिका – इराण संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर दोन्हींकडून हल्ले थांबविण्यात आले होते. पण, मंगळवारी उभय देशांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर या नव्या वादाची सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे हेलिकॉप्टर इराणनेच पाडल्याचा आरोप करत लष्कराला प्रतिहल्ल्याचे आदेश दिले. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिकेशी संबंधित तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले करण्यास सुरुवात केली. या वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली झाली आहे. आगामी काळात हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
