Trump End Iran War : होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा जागतिक तेल वाहतुकीचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे आणि येथील कोणत्याही अडथळ्याचा थेट परिणाम ऊर्जा बाजारावर होतो. इराणने अमेरिकेविरोधातील लढाईत ही सामुद्रधुनी बंद ठेवली आहे. त्यामुळे हा जलवाहतुकीचा मार्ग खुला केला जात नाही तोवर युद्धसमाप्त होणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता निर्णय बदलल्याचे संकेत आहेत.

होर्मुझशिवाय लष्करी मोहिम थांबण्यास तयार

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरीही ते इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबवण्यास तयार आहेत.

नाटोला करणार विनंती

या अहवालानुसार, ट्रम्प हे आधी युद्ध संपवण्याचा आणि सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा विचार नंतर करण्याचा विचार करत आहेत. यासाठी दुसरा पर्याय म्हणजे, हा सागरी मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी आखाती देश आणि नाटो (NATO) सह मित्रराष्ट्रांना पुढाकार घेण्यास विनंती करणार आहेत.

अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राला सांगितले की, सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठीच्या लष्करी योजनांचा अभ्यास केला जात आहे, परंतु सध्या ते राष्ट्राध्यक्षांच्या प्राधान्यक्रमात नाही. अमेरिकेच्या अंदाजानुसार, अशी मोहीम पूर्ण करण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात.

ऊर्जा वाहतुकीचे मार्ग बदलले जाऊ शकतात

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, दीर्घकालीन उपायांसाठी लष्करी कारवाईची आवश्यकता भासणार नाही. ‘न्यूजमॅक्स’शी बोलताना त्यांनी सुचवले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीला वळसा घालून ऊर्जा वाहतुकीचे मार्ग बदलले जाऊ शकतात. इराणचा धोका अद्याप कमी झालेला नाही, असे सांगत आखाती देश अमेरिकेवर इराणवर दबाव कायम ठेवण्यासाठी आग्रह धरत असतानाच हे वृत्त समोर आले आहे.

दरम्यान, ३० मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणला धमकी दिली होती. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाहीतर इराणमधील वीज निर्मिती केंद्र, खार्ग बेट उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता.