अमेरिका-इराणमधील युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार की युद्ध संपणार? असा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत आहे. या युद्धाच्या घडामोडी सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत जर्मनीला धक्का दिला आहे.
जर्मनीमधून तब्बल पाच हजार अमेरिकी सैन्य मागे घेण्याचे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया पुढील ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. इराण युद्धावरून डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक सुरू होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
याबाबत जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी म्हटलं की, “हा निर्णय अपेक्षित आहे, पण तरी तो एक इशारा म्हणून काम करायला हवा. युरोपियन लोकांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेची अधिक जबाबदारी घेतली पाहिजे. लष्करी विस्तार आणि जलद खरेदीच्या बाबतीत जर्मनी योग्य मार्गावर आहे”, असं पिस्टोरियस यांनी म्हटलं आहे.
पेंटागॉनने काय म्हटलं?
“जर्मनीमध्ये सध्या तैनात असलेल्या ३६,००० अमेरिकी सैनिकांपैकी अंदाजे १४ टक्के सैन्य कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सैन्य तैनातीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ६ ते १२ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल”, असं पेंटागॉनकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांनी म्हटलं होतं की, “इराणकडून अमेरिकेचा अपमान केला जात आहे.” फ्रेडरिक मेर्झ यांनी अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच दुसरीकडे ट्रम्प यांनी सुरक्षा आणि ऊर्जा मार्गांवर पुरेसं काम न केल्याबद्दल युरोपीयन मित्र राष्ट्रांवर टीका केली होती.
