Macron warns Trump over Iran US conflict policy and military action in Hormuz Strait : अमेरिका आणि इराण याच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या भूमिका सातत्याने बदलताना दिसत आहेत, यावरून आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका केली आहे.

“तुम्ही रोज परस्पर विरोधी विधानं करू शकत नाहीत”, असे मॅक्रॉन ट्रम्प यांना म्हणाले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी लष्करी मार्गाने पुन्हा खुली करण्याचा पर्याय फेटाळून लावत, असा कोणताही प्रयत्न अवास्तव असल्याचेही मॅक्रॉन म्हणाले. अमिरेकेकडून देण्यात आलेले लष्करी बळ वापरून हा धोराणात्मक सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याचे प्रस्ताव व्यवहार्य नाहीत, असेही ते दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावेळी म्हणाले.

सामुद्रधुनी खुली करण्यासाठी लष्करी बळाचा वापर केल्यास सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इतरांना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि त्यांच्या क्षेपणास्त्रांपासून धोका होऊ शकतो, याकडे मॅक्रॉन यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, “हे अवास्तव आहे कारण यासाठी खूप वेळ लागेल आणि यामुळे सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या सर्वांना किनारपट्टीवरील धोक्यांचा सामना करावा लागेल.” तसेच तोडगा काढण्यासाठी युद्धविराम आणि इराणबरोबर वाटाघाटी पुन्हा सुरू करणे याची आवश्यकता असल्याचेही मॅक्रॉन म्हणाले, असे वृत्त एएफपीने दिले आहे.

मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी इराणने रोखून धरली आहे. यामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांच्याकडून युद्धाबाबत केलेल्या वक्तव्यांवरही टीका केली. “तुम्ही गंभीर व्हायला हवे. जेव्हा तुम्हाला गंभीर व्हायचे असते, तेव्हा तुम्ही आदल्या दिवशी जे काही बोललात त्याच्या उलट आज बोलू शकत नाहीत. आणि कदाचित तुम्ही दररोज बोलूच नये,” असे मॅक्रॉन म्हणाले. युरोपातील अमेरिकेचे मित्रदेश इराणविरोधातील युद्धापासून स्वतःला दूर ठेवत आहेत, या दरम्यान मॅक्रॉन यांचे हे विधान समोर आले आहे

अमेरिकेने इराणमध्ये लष्करी मोहिम सुरू केल्यापासून, ट्रम्प यांनी युद्धाबाबत आणि त्यांच्या रणनीतीबाबत वारंवार बदलणारी विधाने केली आहेत, ज्यामुळे अमेरिकेतून तसेच विविध देशांकडून त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.