Tucker Carlson : अमेरिकेने इराणशी दोन आठवड्यांची शस्त्रसंधी केली आहे. त्यानंतरही लेबनॉनवरचे हल्ले इस्रायलने थांबवलेले नाहीत. दरम्यान आता टकर कार्लसन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख ‘इस्रायलचे गुलाम’ असा केला आहे. कार्लसन आणि ट्रम्प यांच्यात शीतयुद्ध सुरु आहेच. अशात आता त्यांचं हे विधान समोर आल्याने हा वाद आणखी पेटला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था केविलवाणी झाली आहे-कार्लसन

इराणविरोधातली परिस्थिती हाताळताना ट्रम्प यांची अवस्था केविलवाणी झाली आहे, असंही कार्लसन यांनी म्हटलं आहे. तसंच मला डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अजूनही सहानुभूती आहे कारण आपल्याला गुलामांबाबत सहानुभूती वाटतेच. डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत इस्रायलचं ऐकून ते त्यांच्या भूमिका ठरवतात ही वैचारिक गुलामगिरीच आहे असंही कार्लसन म्हणाले आहेत. फॉक्स न्यूजचे माजी होस्ट कार्लसन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातला वाद यामुळे वाढला आहे. USA TODAY ने हे वृत्त दिलं आहे. कार्लसन यांनी १२ एप्रिलला बीसीच्या Sunday With Laura Kuenssberg या कार्यक्रमात त्यांची जी मुलाखत घेतली गेली त्यामध्ये हे मत मांडलं आहे.

“डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते कारण गुलामांबाबत आपल्याला नेहमीच सहानुभूती वाटते”

-टकर कार्लसन

इस्रायलने अमेरिकेला युद्धात ढकललं-कार्लसन यांचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचं ऐकून निर्णय घेतता. इस्रायलच्या सरकारने अमेरिकेला युद्धात ढकललं ही वस्तुस्थिती आहे. याचे पुरावे मी स्वतः पाहिले आहेत. शिवाय ही बाब अमेरिकेसाठी आणि जगासाठी घातक आहे असंही कार्लसन म्हणाले. दरम्यान कार्लसन यांच्या या वक्तव्यानंतर व्हाईट हाऊसकडून काही प्रतिक्रिया येते का? यासाठी USA TODAY ने त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

९ एप्रिलची डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट काय होती?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ एप्रिलला एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी टीकाकारांना आणि कार्लसन यांना उत्तर दिलं होतं. माझ्या टीकाकारांचा बुद्ध्यांक कमी आहे, शिवाय ते प्रसिद्धी लोलुप आहेत असं बोचरं विधान या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी केलं होतं. मी बहुमताने निवडणूक जिंकून आलो आहे. ज्या माणसाला फॉक्स न्यूजने काढून टाकलं तो मला आता सांगतोय की मी कसं वागलं पाहिजे. असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. आता कार्लसन यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. कार्लसन असोत किंवा माझे इतर विरोधक, कुणीही त्यांना महत्त्व देत नाही. तरीही त्यांना माझ्या विरोधात टीका करायची आहे. असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

What Tucker Carlson Said?
टकर कार्लसन यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका

कार्लसन यांच्यासह विरोधकांनी ट्रम्प यांच्यावर काय टीका केली होती?

द टकर कार्लसन शोमध्ये कार्लसन यांनी ६ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केलं होतं. इराणला जे इशारे ट्रम्प देत आहेत तो युद्ध गुन्हा आहे असंही कार्लसन म्हणाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ एप्रिलला जो इशारा दिला त्यात त्यांनी म्हटलं होतं की इराण बेचिराख करुन टाकू. त्यानंतर मरजरी टेलर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. दरम्यान पॉडकास्टर जो रोगन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवला होता. तर डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण हे अमेरिकेच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाच्या विरोधात आहे असं, आता ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार नाही असं विधान केलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करणारे टकर कार्लसन कोण आहेत?

टकर कार्लसन हे अमेरिकेतल्या टीव्ही माध्यमांमध्ये दिसणारे टीकाकार आणि राजकीय अभ्यासक आहेत. फॉक्स न्यूजमध्ये त्यांनी प्रमुख अँकर म्हणून काम केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिराख्यांमध्ये सुरुवातीला कार्लसन यांचा समावेश होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर कार्लसन यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ते कायमच सोशल मीडियावर व्हिडीओज पोस्ट करत असतात, त्याचप्रमाणे लेख लिहून आणि पोस्ट लिहूनही टीका करत असतात. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतरही कार्लसन यांनी पोस्ट करत ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलसह मिळून केलेली कारवाई ही आजवरची सर्वात घृणास्पद कारवाई आहे असं कार्लसन यांनी म्हटलं होतं. आता कार्लसन यांच्या नव्या टीकेला डोनाल्ड ट्रम्प उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.