Tukaram Mundhe Prasad Action update : सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या आदेशावरून टीका होण्याची शक्यता तुकाराम मुंढे यांना आधीच अपेक्षित होती. ‘तुमच्या सणांना हात लावत आहे’, असा आरोपही होईल, याची कल्पना असल्याचं त्यांनी सांगितले. मात्र, ‘मी तुमच्या सणांना हात लावत नाही. माझ्या अधिकारक्षेत्रातील अन्नाला हात लावत आहे’ असं मुंढे यांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या मुंबई कार्यालयात आयोजित ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात ते बोलत होते.

FDA चा हा आदेश ‘धर्मनिरपेक्ष आणि संस्कृतीनिरपेक्ष’ असल्याचंही त्यांनी सांगितलं. सण कोणताही असो, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गणेशोत्सवाच्या काळात FDA ने मोठी कारवाई करत संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे ६.३ लाख किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ९.७६ कोटी रुपये आहे.

धर्मविरोधी पाऊल नाही

सणांच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भेसळयुक्त, निकृष्ट किंवा असुरक्षित अन्नपदार्थ बाजारात येण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी FDA कडून तपासणी आणि कारवाई केली जात असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे FDAच्या कारवाईकडे कोणत्याही धर्माच्या किंवा सणाच्या विरोधातील पाऊल म्हणून न पाहता, अन्नाच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कारवाई म्हणून पाहावं, असा संदेश मुंढे यांनी दिला.

राज्यातील तरुण पिढीला वाचविण्यासाठी, त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आहारपुरक( न्युट्राॅस्युटीकल) उत्पादने आणि मद्यभेसळी विरोधात लवकरच मोहिम उघणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिला. जनतेसाठी अन्न सुरक्षा महत्वाची असून त्यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची आवश्यकता असून शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासूनच अन्न सुरक्षेबाबत मुलांना शिक्षण द्यावे, असा प्रस्ताव लवकरच शिक्षण विभागास सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.