रॉयटर्स, अंकारा
तुर्कीच्या आग्नेय भागातील काहरमनमारस प्रांतामध्ये बुधवारी एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या गोळीबारात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य १३ जण जखमी झाले. मृतांमध्ये आठ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
तुर्कीच्या सानलिउर्फा प्रांतामध्ये मंगळवारी अशाच प्रकारच्या घटनेत १८ वर्षीय विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १६ जण जखमी झाले होते. तेथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गोळीबार करण्याच्या घटना दुर्मीळ असताना दोन दिवसांत तशा घटना घडल्या आहेत. तुर्कीचे गृहमंत्री मुस्तफा चिफ्तची यांनी ही दहशतवादी घटना नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की हा विद्यार्थ्याने वैयक्तिक कारणातून केलेला गोळीबार आहे, हा दहशतवादी हल्ला नाही.
काहरमनमारसचे गव्हर्नर मुकर्रम उनलुर यांनी सांगितले की, एक आठवीचा विद्यार्थी त्याच्या दप्तरात पाच शस्त्रे आणि सात मॅगेझिन घेऊन आला. या वस्तू माजी पोलीस अधिकारी असलेल्या त्याच्या वडिलांच्या असाव्यात असा संशय आहे. त्याने पाचवीचे विद्यार्थी असलेल्या दोन वर्गांमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. पीडित विद्यार्थ्यांचा वयोगट १० ते ११ वर्षे आहे.
