Turkish F-16 fighter jet crash kills pilot: तुर्कियेमध्ये हवाई दलाचे एफ-१६ लढाऊ विमान (फायटर जेट) अपघातग्रस्त झाले आहे. या अपघातात फायटर जेटच्या पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तुर्किये लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लढाई विमानाचा अपघात झाला असून, शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. यात वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
उड्डाणानंतर तुटला संपर्क
हवाई दलाच्या मुख्य हवाई अड्यावरुन एफ-१६ या लढाऊ विमानाने उड्डाण केले. उड्डाणानंतर लढाऊ विमानाचा रेडिओ संपर्क तुटला. ‘हवाई अड्यावरुन वैमानिकाला पुन्हा संपर्क करण्याचा तसेच त्याचे लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, त्यात यश आले नाही’, असे वृत्त तुर्किये लष्कराच्या सोमालिया इनसाईडने प्रसिद्ध केले आहे.
अपघात झाल्याचे समजता शोधकार्य सुरु
लढाऊ विमान एफ-१६ चा अपघात होऊन वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच लष्कराकडून विमानाचे शोधकार्य सुरु करण्यात आले. विमानाच्या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, संबंधित तपास यंत्रणांकडून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
अपघाताचा व्हिडिओ समोर
एफ-१६ या लढाऊ विमानाच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. स्फोटासोबत आग आणि धुराचे लोट हवेत जाताना दिसत आहेत. एक्सवर या विमान अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
अपघाताच्या कारणांचा शोध घेणार
लढाऊ विमान एफ – १६ चा अपघात नेमका काशामुळे झाला? याचा कारणांचा शोध घेतला जाईल, असे तुर्कियेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हवाई दलाने मृत वैमानिकाच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

