Premium

तुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्या फेरीमध्ये जिंकत पुन्हा एकदा स्वत:कडेच सत्ता राखण्यात यश मिळवले.

Recep Tayyip Erdogan
(रेसेप तय्यीप एर्दोगन)

पीटीआय, अंकारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्या फेरीमध्ये जिंकत पुन्हा एकदा स्वत:कडेच सत्ता राखण्यात यश मिळवले. तुर्कस्तानात रविवारी दुसऱ्या फेरीसाठी झालेल्या मतदानात एर्दोगन यांना ५२ टक्के मते मिळाली. त्यामुळे आता ते पुढील पाच वर्षे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत.

एर्गोदन यांच्या एकाधिकारशाहीकडे झुकणाऱ्या राजवटीला केमाल क्लुचदारोलो या सुधारणावादी नेत्याने आव्हान दिले होते. त्यांना सुमारे ४८ टक्के मते मिळाली. सलग २० वर्षे सत्तेवर असणाऱ्या एर्गोदन यांना यंदा सत्ता गमवावी लागेल असे चित्र होते. मात्र १४ मे रोजी झालेल्या पहिल्या फेरीत त्यांना ४९.५२ टक्के मते मिळाली होती, तर क्लुचदारोलो यांना ४४.८८ टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या उमेदवाराने पाच टक्क्यांहून थोडी जास्त मिळवली होती. कोणालाही आवश्यक ५० टक्के मते न मिळाल्यामुळे दोन आठवडय़ांनी मतदानाची दुसरी फेरी पार पडली. त्यामध्ये एर्गोदन यांना नि:संशय बहुमत मिळाले. त्यानंतर त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. या मतदानामध्ये जवळपास अडीच कोटी मतदारांनी भाग घेतला.

एर्दोगन यांचे नेतृत्व मजबूत आणि निर्णायक असल्याच्या प्रतिमेचा त्यांना फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी क्लुचदारोलो हे अधिक लोकशाहीवादी, पारंपरिक आर्थिक धोरणांचे पाठीराखे आणि पाश्चात्त्य देशांशी संबंध सुधारण्याच्या बाजूचे आहेत, तर एर्दोगन यांचे युरोप आणि पाश्चात्त्य देशांशी संबंध ताणलेले आहेत.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एर्दोगन यांचे पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. जागतिक मुद्दय़ांवरील दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध यापुढेही बळकट होत राहतील असे ट्वीट त्यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Turkish president recep tayyip erdogan won the presidential election in the second round amy

First published on: 30-05-2023 at 00:40 IST
Next Story
गुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू