विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या माफीनाम्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वादविवाद पुन्हा उफाळून आला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयाबद्दल केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी याविषयी चर्चासत्रेही घेतली आहे. अशाच एका चर्चासत्रामध्ये भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी इंदिरा गांधींचं एक पत्र वाचून दाखवलं.

आजतक या वृत्तवाहिनीवर चाललेल्या चर्चासत्रादरम्यान निवेदकाने राजनाथ सिंह यांच्या विधानाच्या संदर्भाने विचारलं की हे खरं आहे की सावरकरांनी इंग्रजांना नऊ वेळा माफीनामा दिला होता. त्यावर संबित पात्रा म्हणाले की, मला खरंतर वाईट वाटत आहे की माझ्यासारखा एक साधारण प्रवक्ता सावरकरांसारख्या महान व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करत आहे. आजकाल सावरकरांबद्दलची जी चर्चा सुरू आहे त्यामुळे मला त्रास होत आहे.

पात्रा पुढे म्हणाले की, ज्यांनी १३ वर्षे कैदेत काढली, ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांनाच आज काँग्रेस शिव्याशाप देत आहे. तुम्ही इंदिरा गांधींचंच उदाहरण घ्या. त्यांनी जे सांगितलं ते आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, असं म्हणत त्यांनी इंदिरा गांधींनी लिहिलेलं एक पत्र वाचायला सुरूवात केली. पात्रा यांनी सांगितलं की, सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींनी सावरकरांसाठी ११ हजार रुपये दान केले होते. तसंच सावरकरांचं एक पोस्टाचं तिकीटही त्यांनी वापरात आणलं होतं.

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

“सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते,” असे राजनाथ सिंह म्हणाले होते.