जबलपूर : त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी न्यायाधीश असलेली सासू गिरिबाला सिंह हिला सीबीआयने गुरुवारी अटक केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बुधवारी तिचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता.

सीबीआयच्या पथकाने गुरुवारी भोपाळच्या बाग मुघलिया भागातील घरी गिरिबाला सिंह हिची चौकशी केली. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. गिरिबाला सिंहची औपचारिक कोठडी मिळवण्यासाठी तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्विशाचा पती समर्थ सिंह याला सीबीआयने यापूर्वीच अटक केली असून तो त्यांच्या कोठडीत आहे.

न्यायमूर्ती देवनारायण मिश्रा यांनी बुधवारी गिरिबाला सिंहवरील आरोपांचे गांभीर्य स्पष्ट केले. सत्र न्यायालयाने १५ मे रोजी तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, याप्रकरणी तपास व आरोपांचे गांभीर्य पाहता जामीन रद्द करत असल्याचे न्यायाधीश म्हणाले.

सूनेचा विविध प्रकारे छळ

  • त्विशा गर्भवती असल्याचे समजताच पती आणि सासूने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. मूल दुसर्‍याचे असल्याचे म्हणत तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप सीबीआयने केला.
  • लग्नात मिळालेला हुंडा त्यांच्या दर्जाचा नसल्याचे सांगत त्विशाचा छळ केला जात होता. तसेच तिच्या नावावर असलेले शेअर्स स्वत:च्या नावावर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता.
  • तिला आनंदाने जगूही दिले नाही आणि रडूही दिले नाही, असे त्विशाच्या कुटुंबीयांनी बुधवारी न्यायालयात सांगितले.