तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यातून आता हे स्पष्ट झालं आहे की तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री जोसेफ विजय असतील. जोसेफ विजयच्या टीव्हीके या पक्षाने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तमिळनाडूत बहुमतासाठी ११७ जागा आवश्यक आहेत. त्यामुळे विजय मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जातं आहे. दरम्यान विजयने त्याच्या माजी चालकाच्या मुलाला तिकिट दिलं होतं जो विजयी झाला आहे.
सबरीनाथ यांचा विजय झाला आहे
अभिनेता विजयने त्याच्याकडे चालक म्हणून एकेकाळी काम करणाऱ्या राजेंद्रन यांच्या मुलाला म्हणजेच सबरीनाथ आर. हे विरुम्पक्कम मतदारसंघातून तिकिट दिलं होतं. सबरीनाथ यांचा या ठिकाणी विजय झाला आहे. सबरीनाथ यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यानुसार त्यांचं वय ३० वर्षे आहे.
२९ मार्चला नेमकं काय घडलं होतं?
२९ मार्चला विजयने उमेदवाराच्या नावांची घोषणा केली होती. त्यावेळी सबरीनाथ आणि त्यांचे वडील भावूक झाले होते. या दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. सबरीनाथ यांनी विजयचे पाय धरले होते, त्यावेळी विजयने सबरीनाथला मिठी मारली होती. हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच भावूक करुन गेला होता. सगळ्यांच्या डोळ्यांत तेव्हा अश्रू होते. सबरीनाथचे वडील विजयसाठी ड्रायव्हर म्हणून काम करायचे. आता ते विजयचे खासगी सचिव आहेत.
विजय आणि सबरीनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल
विजय आणि सबरीनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान पीटीआयशी बोलताना सबरीनाथने सांगितलं होतं की मी राजकारणात आलो नव्हतो तेव्हा माझ्या वडिलांना वाटत होतं की मी इंजिनिअर व्हावं. पण मी राजकारणात आलो कारण मला विजय यांनी संधी दिली. मला शिकवायचं, इंजिनिअर करायचं म्हणून माझ्या वडिलांनी जे त्यांना शक्य होतं ते सगळं केलं. तसंच त्यांनी माझ्या शिक्षणासाठी कर्जही घेतलं होतं. सबरीनाथने सांगितलं की २०२१ मध्ये मला कतार या ठिकाणी नोकरीही मिळाली होती. मी तिकडे गेलोही होतो, नोकरी चांगली होती पण मी तिकडे गेल्यावर मला इथली आठवण येत होती. त्यावेळी मी ऐकलं होतं की विजय यांना पक्ष स्थापन करायचा आहे. त्यावेळी मी चेन्नईला परतलो आणि विजय यांना भेटून तुमच्या राजकीय वाटचालीचा एक भाग मला व्हायचं आहे असं त्यांना सांगितलं. माझ्या वडिलांना हा निर्णय तेव्हा आवडला नव्हता. पण विजय यांनी जेव्हा निडवणुकीत तिकिट दिलं आणि आमदारकी लढवण्याची संधी दिली तेव्हा मला आणि माझ्या वडिलांना रडू आलं होतं. विजय यांच्या पक्षाशी मी २०२४ मध्ये जोडलो गेलो, माझ्या वडिलांचाही विरोध नंतर मावळला. आता मला त्यांच्या पक्षात येऊन आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे असंही सबरीनाथ यांनी सांगितलं.
