चेन्नई : तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत १०८ जागा जिंकून विजय मिळवल्यानंतर, ‘तमिलगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयाला भेट दिली. या वेळी अनेक आमदारांनी विजय यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, गुरुवार ७ मे रोजी विजय यांचा शपथविधी होणार आहे.
पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड आणि विधानसभेतील आमदारांचे वर्तन यावर चर्चा करण्यासाठी विजय यांनी मंगळवारी पक्षा कार्यालयात बैठक बोलावली होती, अशी माहिती एका आमदाराने दिली. आमदारांनी एकमताने विजय यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे. तत्पूर्वी, टीव्हीके प्रमुखांनी पक्ष मुख्यालयात पेरियार ई. व्ही. रामासामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. कामराज, वेलू नाचियार आणि अंजलाई अम्माल आदींच्या प्रतिकृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तमिळनाडूत ‘टीव्हीके’ने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर ‘द्रमुक’ला ५९ आणि ‘अण्णा द्रमुक’ला ४७ जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला ११८ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. संख्याबळ कमी असूनही विजय यांनी सरकार स्थापनेचा विश्वास व्यक्त केला आहे.
केंद्राच्या सहकार्याची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीव्हीके’चे निवडणुकीतील कामगिरीबद्दल कौतुक केले होते. याबद्दल पक्षाने त्यांचे आभार मानले आहेत. ‘राज्याच्या प्रगतीसाठी आम्ही केंद्र सरकारच्या सहकार्याची अपेक्षा करतो,’ असे टीव्हीकेने ‘एक्स’वर म्हटले आहे.
एका मताने पराभव
तिरुप्पत्तूर : द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि सहकार राज्यमंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा तिरुप्पत्तूर विधानसभा मतदारसंघात केवळ एका मताो पराभव झाला. ‘टीव्हीके’चे सीनिवास सेतुपथी आर. यांनी ८३,३७५ मते मिळवून विजय मिळवला, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली.
जनादेशाबद्दल आभार
‘टीव्हीके’चे संस्थापक विजय मंगळवारी तामिळनाडूच्या जनतेने दिलेल्या ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी जनादेशाबद्दल त्यांचे आभार मानले. विशेषत: तरुणांनी निवडणुकीचा निकाल ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पक्षाच्या स्थापनेपासून उपहास आणि टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतरही ‘टीव्हीके’ केवळ जनतेवर अवलंबून राहून खंबीरपणे उभी राहिली आहे. तामिळनाडूची जनता प्रेमाने पक्षाच्या पाठीशी उभी राहिली,’ असे विजय यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
स्टॅलिन यांचा राजीनामा
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत ‘द्रमुक’चा पराभव झाल्यानंतर मंगळवारी एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपला पक्ष विरोधी पक्षात प्रभावीपणे काम करेल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. निवडणुकीतील पराभव स्वीकारत स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यपालांनी तो स्वीकारला. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना पदावर राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
