Controversy escalates over the protocol of playing Vande Mataram : शासकीय समारंभांच्या शिष्टाचारामध्ये तमिळ थाई वाझथू या तामिळनाडूच्या राज्यगीताला अग्रस्थान दिलं पाहिजे, असं सीपीआयचे राज्य सचिव एम. वीरपांडियन यांनी रविवारी सांगितलं. जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी सोहळ्याची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली. त्यानतंर जन गण मन हे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. त्यानंतर तमिळ थाई वाझथू हे गीत वाजवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

सीपीआय नेते म्हणाले, या आदेशाने तामिळनाडूमधील दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरेचे उल्लंघन झाले आहे. पारंपरिकरित्या शासकीय कार्यक्रमांची सुरुवात तमिळच्या राज्यगीताने होते आणि समारोप राष्ट्रीय गीताने होतो.

सीपीआय नेत्यांनी नेमकी काय मागणी केली?

राजभवनाने दिलेल्या निर्देशांनुसार, तमिळनाडू सरकारने आयोजित केलेल्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रम पुत्रिकेत वंदे मातरम गीताला प्राधान्य देण्यात आलं होतं. तर, तमिळ भाषेला तिसऱ्या स्थानी ठेवण्यात आले होते. याबाबत बोलताना सीपीआय नेते म्हणाले, हे प्रस्थापित प्रथेचे उल्लंघन आहे. या चुकीसाठी कोण जबाबदार होते, याचं स्पष्टीकरण तामिळनाडू सरकारने जनतेला दिलं पाहिजे. तमिळगा वेत्री कझगमने तमिळथाई वाझथूला अग्रस्थान मिळेल याची खात्री दिली पाहिजे. अशी चूक पुढे होता कामा नये. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि हंगामी अध्यक्षांनी हे सुनिश्चित करावं की आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेल्या उद्याच्या विधानसभा अधिवेशनात तसंच, सर्व शासकीय कार्यक्रम आणि समारंभांमध्ये सर्वप्रथम तमिळ राज्यगीत वाजवले जाईल आणि समारोपावेळी राष्ट्रगीत वाजवले जाईल, असं वीरपांडियन यांनी पत्रात लिहिलं आहे.

वीरपांडियन यांनी असाही आरोप केलाय की, या मुद्द्याला ऐतिहासिक आणि वैचारिक पैलू आहेत. ते म्हणाले की स्वातंत्रलढ्या दरम्यान असा निर्णय घेण्यात आला होता की वंदे मारतम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही, कारण हे गीत एका विशिष्ट देवतेला समर्पित होते आणि त्यात सांप्रदायिक धार्मिक स्वरुप होते.