TVK’s Seenivasa Sethupathy faces a critical legal battle : तमिळनाडूतील सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे नवनिर्वाचित आमदार आर. श्रीनिवासा सेतुपती यांच्या आमदारकीविरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी डीएमके (DMK) नेते के.आर. पेरियाकरुप्पन यांनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे कोर्टाने आर. श्रीनिवासा यांना आमदारकीची शपथ घेण्यापासून रोखले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
तिरुप्पत्तूर मतदारसंघातून पेरियाकरुप्पन यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. टीव्हीके प्रमुख आणि सुपरस्टार अभिनेता विजय यांच्या लोकप्रियतेच्या लाटेमुळे सेतुपती यांना ८३ हजार ३६५ मते मिळाली, तर पेरियाकरुप्पन यांना ८३ हजार ३६४ मते मिळाली. टपाल मतांच्या (postal votes) मोजणीत त्रुटी असल्याचा आरोप डीएमके नेत्यांनी केला आहे. न्यायालयाच्या या निर्बंधामुळे सेतुपती यांना या आठवड्यात होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात सहभागी होता येणार नाही.
टीव्हीके पक्षाने एप्रिल महिन्यातील निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत २३४ पैकी १०८ जागा जिंकल्या आहेत. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा विजय यांचा पक्ष १० जागांनी मागे राहिला होता. यानंतर सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके आणि मावळती सत्ताधारी डीएमके आघाडी (ज्यात काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीके यांचा समावेश आहे) यांच्यात मोठी ओढाताण झाली. विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले डीएमके आणि एआयएडीएमके (AIADMK) एकत्र येण्याची अभूतपूर्व शक्यताही वर्तवण्यात येत होती. अखेरीस, विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेस (५ जागा), डावे पक्ष (४ जागा), व्हीसीके (२ जागा) आणि टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या एएमएमके (१ जागा) या पक्षांनी पाठिंबा दिला. विजय यांनी रविवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, मात्र आपल्या युतीचे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. हे मतदान बुधवारी होण्याची शक्यता आहे.
विश्वासदर्शक ठरावाकरता विजय यांच्याकडे पुरेसे संख्याबळ?
सध्या टीव्हीकेकडे १०७ (विजय यांची एक जागा सोडून) अधिक काँग्रेस ५, डावे पक्ष ४, व्हीसीके २, इंडियन युनियन मुस्लिम लीग २ आणि एएमएमके १ अशा एकूण १२१ जागा आहेत. २३४ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. सेतुपती यांना मतदान करता आले नाही तरी, विजय यांच्याकडे १२० आमदारांचे पाठबळ असेल, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा दोनने जास्त आहे.
