तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल १०८ जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. मात्र, १०८ जागा जिंकल्या असल्या तरी टीव्हीके पक्ष बहुमतापासून दूर असल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी विजय जोसेफ यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला असून आता आमदारांचं संख्याबळ ११३ पर्यंत पोहोचलं आहे. मात्र, ११८ या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी पाच आमदारांचं संख्याबळ हवं आहे. त्यामुळे तामिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.
दरम्यान, आज टीव्हीके प्रमुख विजय जोसेफ यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन तामिळनाडूमध्ये पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. तसेच तामिळनाडूच्या राज्यपालांकडे टीव्हीकेच्या १०८ आमदार आणि काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याच्या सहीचं पत्र दिलं आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे ११८ आमदारांचं संख्याबळ आवश्यक असल्याने राज्यपालांनी नियमावर बोट ठेवलं आहे.
टीव्हीके प्रमुख विजय जोसेफ यांनी ११३ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं असलं तरी राज्यपालांनी ‘११८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन परत या’ असं सांगितलं असल्याची चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. या घडामोडींमुळे आता तामिळनाडूच्या राजकारणात संख्याबळाचा खेळ सुरू झाला असून आणखी राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीतील पदार्पणात २३४ पैकी १०८ जागा जिंकल्या. परंतु बहुमतासाठी १० जागा कमी पडल्या आहेत. आता स्थानिक पक्ष अजूनही सावध भूमिका घेत असल्याने घडामोडी वाढल्या आहेत. यातच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणारे विजय हे गुरुवारी (७ मे) शपथ घेऊ शकतील का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विजय जोसेफ हे सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव कशी करतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
विजय जोसेफ यांना बहुमत सिद्ध करावं लागणार
विजय जोसेफ यांना सभागृहात आपल्या सरकारचं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही जोसेफ यांना अधिक मदतीची गरज आहे. कारण काँग्रेसकडे फक्त पाचच जागा आहेत. काँग्रेस व्यतिरिक्त इतर कोण (अपक्षांसह) ‘टीम विजय’चा भाग होण्यासाठी सोबत येईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दोन जागा जिंकणारा व्हीसीके (VCK) पक्ष सध्या काय भूमिका घ्यावी, यावर अंतर्गत चर्चा करत आहे. या निवडणुकीत डीएमकेने ५९, एआयएडीएमकेने ४७, पीएमकेने ४, आययुएमएलने २, सीपीआयने २, सीपीआय(एम) ने २ आणि भाजपा, डीएमडीके व एएमएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
