तमिळनाडूच्या निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. मात्र, टीव्हीके पक्ष बहुमतापासून दूर असल्याने सरकार स्थापन करण्यासाठी विजय जोसेफ यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तमिळनाडूत सध्या सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने आमदारांचं संख्याबळ ११३ पर्यंत पोहोचलं. पण ११८ या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ५ आमदारांची गरज आहे. त्यामुळे विजय जोसेफ यांच्यासमोर हे सर्वात मोठं आव्हान मानलं जात आहे.

यातच टीव्हीके प्रमुख विजय जोसेफ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचं नियोजन देखील केलं होतं. त्यासाठी विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची दोनदा भेटही घेतली आणि ११३ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. मात्र, राज्यपालांनी ‘११८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन या’ असं सांगत नियमांवर बोट ठेवलं. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात सरकार स्थापनेचा पेच आणखी वाढला आहे.

या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे ‘डीएमके’ आणि ‘एआयएडीएमके’ हे पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे जर असं झालं तर तमिळनाडूच्या राजकारणात ही मोठी घडामोड असेल असं मानलं जात आहे. या चर्चा सुरू होताच विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी एक मोठा इशारा दिला आहे. ‘जर डीएमके आणि एआयएडीएमकेने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर टीव्हीकेचे सर्व १०७ आमदार सामूहिक राजीनामा देतील’, असा इशारा टीव्हीकेच्या नेत्यांनी दिला आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, एम.के.स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके आणि एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएडीएमकेने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यास टीव्हीके आपल्या सर्व १०७ आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याचा विचार करू शकते, असं टीव्हीके पक्षातील काही सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, हा इशारा विजय यांनी स्वतः अधिकृतपणे दिलेला नसला तरी निवडणुकीनंतरच्या वाढलेल्या घडामोडींमुळे टीव्हीकेमधील आमदारांची निराशा देखील यामधून दिसून येते. टीव्हीकेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने म्हटलं की, “आम्हाला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या पक्षाकडे दुर्लक्ष करता येणार नाही”, असं त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर बोलताना म्हटलं आहे.

TVK MLAs Mass Resignation Warning
तमिळनाडूच्या निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत.

विजय जोसेफ आमदारांची जुळवाजुळव कशी करणार?

विजय यांच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीतील पदार्पणात २३४ पैकी १०८ जागा जिंकल्या. परंतु बहुमतासाठी १० जागा कमी पडल्या. आता स्थानिक पक्ष अजूनही सावध भूमिका घेत असल्याने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. यातच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणारे विजय हे आता आमदारांच्या संख्याबळाच्या पेचामुळे शपथ घेऊ शकतील का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विजय जोसेफ हे सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव कशी करतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

सत्तेसाठी द्रमुक व अण्णाद्रमुक एकत्र येण्याची शक्यता

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु, त्याला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आला. तामिळनाडूत अण्णाद्रमुक व द्रमुक हे दोन प्रस्थापित पक्ष सत्तेच्या नव्या समीकरणाचा विचार करत आहेत. विजयचा टीव्हीके पक्ष बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास पुढे काय करता येईल, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अण्णाद्रमुकने (AIADMK) आमदारांना पुद्दुचेरीतील रिसॉर्टवर हलवले आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूचे राज्यपाल आज (गुरूवारी) केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बहुमत असल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत, असे राज्यपालांनी विजय यांना सांगितले होते. त्यामुळे विजय यांच्यासमोर सत्ता स्थापनेआधी अनपेक्षित अडथळा आला आहे.

विजय जोसेफ यांना बहुमत सिद्ध करावं लागणार

विजय जोसेफ यांना सभागृहात आपल्या सरकारचं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही जोसेफ यांना अधिक मदतीची गरज आहे. कारण काँग्रेसकडे फक्त पाचच जागा आहेत. काँग्रेस व्यतिरिक्त इतर कोण (अपक्षांसह) ‘टीम विजय’चा भाग होण्यासाठी सोबत येईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दोन जागा जिंकणारा व्हीसीके (VCK) पक्ष सध्या काय भूमिका घ्यावी, यावर अंतर्गत चर्चा करत आहे. या निवडणुकीत डीएमकेने ५९, एआयएडीएमकेने ४७, पीएमकेने ४, आययुएमएलने २, सीपीआयने २, सीपीआय(एम) ने २ आणि भाजपा, डीएमडीके व एएमएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

जोसेफ विजय यांचा शपथविधी रोखल्याने कपिल सिब्बल संतापले

तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमधील घडामोडींवर बोलताना राज्यसभा खासदार आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांवर निशाना साधला आहे. कपिल सिब्बल म्हणाले की, “तमिळनाडूचे राज्यपाल हे भाजपाचे एजंट आहेत. भाजपाचे हित जपण्यासाठी ते संविधान चिरडून टाकत आहेत. सर्वात मोठ्या पक्षाचे नेते, विजय यांना बोलवा. त्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्या. त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करू द्या. बहुमतामध्ये निवडणुकीनंतर कोणतीही आघाडी नसते. सरकारिया कमिशन. हा प्रस्थापित कायदा आहे. पण ऐकतोय कोण!”, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.