Joseph Vijay Tamil Nadu CM Oath updates and legal controversy explained : तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरूवारी सकाळी टीव्हीके प्रमुख जोसेफ विजय पुन्हा एकदा लोकभवन येथे पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांना पुन्हा एकदा बहुमत घेऊन येण्यास सांगितले. यादरम्यान राज्यसभा खासदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांवर निशाना साधला आहे.
नेमकं काय झालं?
तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. दरम्यान टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी आज (गुरूवारी) सलग दुसऱ्यादिवशी लोक भवन येथे जाऊन राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेतली. सर्वाधिक जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी आपल्याला आमंत्रण द्यावे, अशी विनंती विजयने पुन्हा एकदा राज्यपालांना केली. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यपालांना दोन आठवड्यांची मुदत मागितली. परंतु, राज्यपालांनी विजय यांची विनंती मान्य केली नाही. तमिळनाडूत बहुमतासाठी आवश्यक असलेले ११८ आमदारांचे समर्थन असलेले कागदोपत्री पुरावे आधी सादर करावे, असे राज्यपालांनी विजय यांना सांगितले. अशी माहिती चर्चेत सहभागी सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.
यानंतर सिब्बल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहून सर्वच राज्यपालांवर टीका केली, ते भाजपाचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच त्यांनी पोस्टमध्ये सरकारिया कमीशनचाही उल्लेख केला.
“तमिळनाडू, राज्यपाल हे भाजपाचे एजंट आहेत. भाजपाचे हित जपण्यासाठी ते संविधान चिरडून टाकत आहेत. सर्वात मोठ्या पक्षाचे नेते, विजय यांना बोलवा. त्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्या. त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करू द्या. बहुमतामध्ये निवडणुकीनंतर कोणतीही आघाडी नसते. सरकारिया कमिशन. हा प्रस्थापित कायदा आहे. पण ऐकतोय कोण!”, असे सिब्बल म्हणाले.
सरकारिया कमिशन काय आहे?
सरकारिया आयोगाची स्थापना १९८३ मध्ये भारत सरकारने केली होती. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधांचा आढावा घेणे, हा या आयोगाचा मुख्य उद्देश होता. या आयोगाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती आर.एस. सरकारिया होते, म्हणून याला सरकारिया आयोग म्हटले जाते.
या आयोगाने मुख्यत्वे चार मुद्द्यांवर आपल्या शिफारसी मांडल्या होत्या, पहिला मुद्दा केंद्र आणि राज्यांचे अधिकारांची वाटणी, दुसरा राज्यपालांची भूमिका आणि तिसरा राष्ट्रपती राजवट लागू करणे आणि चौथे केंद्र-राज्य यांच्या सहकार्य मजबूत करणे. सरकारिया आयोगाचा अहवाल १९८८ मध्ये आला होता.
टीव्हीकेची इतर पक्षांशी चर्चा
टीव्हीके प्रमुख विजयने बुधवारीदेखील राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. तमिळनाडू निवडणुकीत टीव्हीके १०८ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
टीव्हीके पक्षाकडे सध्या एकूण १०८ जागा आहेत. त्यापैकी दोन जागांवर विजय जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. काँग्रेसच्या पाच आमदारांचे टीव्हीकेला समर्थन मिळाले आहे. त्यामुळे विजय यांच्याकडे सध्या ११३ आमदारांचे समर्थन आहे. बहुमतासाठी त्यांना ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. बहुमत जुळवण्यासाठी टीव्हीके सध्या सीपीआय , सीपीआयएम आणि इतर पक्षांशी चर्चा करत आहे.
