TVK Worker Murder: तमिळनाडुचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाच्या तमिळग वेट्टरी कळघम (टीव्हीके) पक्षाच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. कन्नन असे टीव्हीकेच्या या कार्यकर्त्याचे नाव असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येच्या संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नन हा कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात होता तसेच तो सराईत गुन्हेगार होता. समोर आलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी कन्नन त्याच्या मित्रांसोबत असताना दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने कन्ननवर सुऱ्याने वार केले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
पाच जणांना अटक
शास्त्री नगर पोलिसांनी विशेष पथक तयार करून भरणी, राकेश, नरेश, मणीकंदन आणि हरिहरन अशी नावे असलेल्या पाच संशयितांना अटक केली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कन्नन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २००९ मध्ये भरणीचे काका शिवा यांची कथितपणे हत्या केली होती. तसेच २०१४ मध्ये भरणीचे वडील वेलू यांचीही हत्या करण्यात आली होती. याचा सूड उगवण्यासाठी पूर्ववैमनस्यातून कन्ननची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
या घटनेनंतर, तमिळनाडूच्या पोलीस महासंचालकांनी कन्ननवरील हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, अड्यारचे उप-पोलीस आयुक्त कार्तिकेयन आणि शास्त्री नगरच्या पोलीस निरीक्षक रोहिणी यांची प्रतीक्षा यादीत रवानगी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षांनी या घटनेवरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करत टीव्हीके सरकारवर टीका केली.
उदयनिधी स्टॅलिन यांची टीका
विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री उद्या पोलीस खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देण्यापूर्वीच, राजधानीत त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याची हत्या झाली आहे. जीवाच्या रक्षणासाठी सत्ताधारी टीव्हीके पक्षात प्रवेश केलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा रस्त्यावर पाठलाग करून खून करण्यात आला. हीच तमिळनाडूतील विजयची कायदा आणि सुव्यवस्था आहे”, अशी टीका स्टॅलिन यांनी केली.
