Kanpur Plane Crash News Update: उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे गुरूवारी सकाळी एक खासगी प्रशिक्षणार्थी विमान कोसळून वैमानिक आणि सह-वैमानिकाचा मृत्यू झाला. गंगा नदीच्या काठावर असलेल्या एका शेतात हे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सांगितले की, या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नसून चौकशी सुरू आहे.
कानपूरमधील गर्ग एव्हिएशन या खासगी प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते. गंगा नदीच्या किनाऱ्यालगत विमान कोसळल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी या ठिकाणी धाव घेतली. अपघातग्रस्त विमानातून वैमानिक आणि सह-वैमानिक यांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य वैमानिक सचिन भाटिया हे गुजरातचे रहिवासी होते. त्यांना विमान उडवण्याचा ३,००० तासांहून अधिकचा अनुभव होता. तर सह-वैमानिक अभिषेक पुजारी कर्नाटकचे रहिवासी होते.
पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने सकाळी सुमारे ११.३० वाजता प्रशिक्षण केंद्रातून उड्डाण घेतले आणि २० मिनिटांनी परत येत असताना ते कोसळले. खासगी संस्थेद्वारे २०२३ मध्ये दोन इंजिन असलेले टेक्नाम विमान प्रशिक्षणासाठी आणण्यात आले होते, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात दिली आहे.
कासगंजमध्ये विमान अपघात
यावर्षी जून महिन्यात राज्यातील कासगंज जिल्ह्यात दोन आसनी प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळले होते. या दुर्घटनेत महिला वैमानिक किरकोळ जखमी झाल्या होत्या. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी पोलिसांनी सांगितले होते की, अलीगढ विमानतळावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलेले विमान कासगंज जिल्हा मुख्यालय क्षेत्रातील पोलीस लाइन्सजवळ कोसळले. जमीनीवर कोसळण्यापूर्वी उच्च दाबाच्या वीज वाहिनीशी त्याचा संपर्क आला.
