मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्माच्या मृत्यूचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. त्विशाच्या कुटुंबाने दुसऱ्यांना शवविच्छेदन केलं जावं अशी मागणी केली आहे. भोपाळ पोलिसांनी आता त्विशाच्या कुटुंबाला पत्र लिहिलं आहे , त्यात पोलिसांनी म्हटलं आहे की त्विशाचा मृतदेह कुजण्यास सुरुवात होऊ शकते. कारण मृतदेह आहे त्या वातावरणात ठेवण्यासाठी अल्ट्रा लो टेम्परेचर सुविधेची गरज असते. ही सुविधा भोपाळच्या AIIMS रुग्णालयात उपलब्ध नाही. १२ मे रोजी त्विशाचा मृतदेह तिच्या नवऱ्याच्या घरी आढळून आला होता. ज्यानंतर तिचा नवरा समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२० मे रोजी लिहिलेल्या पत्रात पोलिसांनी काय म्हटलंय?
कटारा हिल्स पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी त्विशाच्या आई वडिलांना पत्र लिहून कळवलं आहे की त्विशाचा मृतदेह शवागारात आता कुजण्यास सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्विशाचा मृतदेह १३ मे रोजी या ठिकाणी आणण्यात आला. त्यानंतर उणे ४ अंश तापमानात हा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. दरम्यान एम्स रुग्णालयाचा पॅथॉलॉजी विभाग आणि फॉरेन्सिक विभाग यांनी १८ मे रोजी पोलिसांना हे कळवलं आहे की त्विशाचा मृतदेह उणे ८० तापमानात ठेवावा लागेल. कारण आता तो मृतदेह कुजण्यास सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. शिवाय इतक्या कमी तापमानात ठेवण्याची सुविधा एम्स रुग्णालयात नाही. सध्या उणे चार अंशात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला त्विशाचा मृतदेह उणे ४ अंश तापमानात एम्स रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. त्विशाचा मृतदेह कुजण्यास सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली आहे. ज्यानंतर पोलिसांनी त्विशाच्या आई वडिलांना पत्र लिहून माहिती दिली आहे. एवढंच नाही तर त्विशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पुन्हा करायचं असेल तर आमचा काहीही आक्षेप नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र त्विशाचा मृतदेह १३ मेपासून रुग्णालयातील शवागारात आहे. त्यामुळे तो मृतदेह कुजला तर काहीही करता येणार नाही. त्यामुळे त्विशाच्या कुटुंबाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा आणि त्विशाचा मृतदेह ताब्यात घ्यावा असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

त्विशाच्या शवविच्छेदन अहवालात काय म्हटलं आहे?
भोपाळ येथील एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार त्विशाच्या मानेवर समांतर अंतरावर दोन खुणा आहेत. नायलॉनच्या बेल्टने तिचा गळा आवळला गेल्याचं दिसतं आहे. मात्र हा बेल्ट ऑटोप्सी दरम्यान AIIMS च्या वैदकीय मंडळाला दिलेला नाही. १२ मे रोजी त्विशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या नवऱ्याच्या घरी आढळला होता. त्यानंतर आता हा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्याचप्रमाणे त्विशाच्या शरीरावर बऱ्याच जखमा दिसून येत आहेत असंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांनी हा बेल्ट आम्ही नंतर जप्त केला कारण त्विशाचा मृतदेह आम्ही तिच्या घरुन ताब्यात घेतला नाही तर रुग्णालयातून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला असं स्पष्टीकरणही दिलं आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही आत्महत्या आहे असं म्हटलं आहे.
पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी काय सांगितलं?
त्विशाचा मृतदेह १२ मे रोजी तिच्या घरी होता, ज्यानंतर आम्ही या प्रकरणात सगळा तपास केला. आम्ही त्विशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदनही केलं. मात्र यात कुठेही आढळून आलं नाही की त्विशाची हत्या झाली आहे. तसंच आम्हाला जे पुरावे सापडले आहेत त्यावरुनही हे स्पष्ट होतं आहे की ही आत्महत्या आहे. त्विशाची हत्या झालेली नाही. तिने आत्महत्या केली आहे असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.
त्विशाचा नवरा समर्थ सिंग बेपत्ता
त्विशा शर्माचा मृत्यू झाल्यापासून तिचा नवरा समर्थ सिंग बेपत्ता आहे. तो कुठे आहे याबाबत कुणालाही अद्याप माहिती नाही.समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे तर त्याची आई गिरीबाला सिंग या निवृत्त न्यायाधीश आहेत. दुसरीकडे त्विशाच्या सासूने म्हणजेच गिरीबाला सिंग यांनीही त्विशावर बरेच आरोप केले आहेत.
कोण होती त्विशा शर्मा
त्विशा शर्मा ही मूळची नोएडाची असून तिने २००९ ते २०१२ दरम्यान मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश केला. कठोर परिश्रम, ग्रुमिंग आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिस पुणे सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
मिस पुणेचं विजेतेपद हा तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पाँइंट होता. कारण, यानंतरच तिच्यासाठी जाहिरात, मॉडेलिंग आणि अभिनयाची दारे खुली झाली. त्विशाने व्यावसायिक जाहिरांतीमध्येही काम केलं आहे.
तेलुगू चित्रपटांतूनही त्विशा झळकली. ‘मुग्गुरु मोनागल्लू’हा तिचा पहिला तेलगू चित्रपट होता. तर, २०१८ मध्ये तिने ‘जरा संभल के’ नावाच्या लघुपटातही काम केले होते. तिच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक सहकलाकारांनी तिच्या कामाचं कौतुकच केलं आहे. ती अत्यंत सर्जनशील, अभिव्यक्त आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती होती, असं सहकलाकारांनी म्हटलं आहे.
