Twisha Sharma Bhopal Case: त्विशा शर्माचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यास भोपाळमधील स्थानिक न्यायालयाने नकार देत, कुटुंबियांची मागणी फेटाळून लावली. ३३ वर्षीय त्विशाचा तिच्या सासरच्या घरी १२ मे रोजी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. लग्नाच्या पाच महिन्यातच त्विशाचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. त्विशाच्या कुटुंबियांनी या तपासात, शवविच्छेदनात आणि नोंदी सदोष असल्याचा आरोप केला आहे. त्विशाच्या गूढ मृत्यू प्रकरणी पाच महत्वाचे अनुत्तरीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बेल्ट देण्यास उशीर का केला?
त्विशाचा मृतदेह घरात बेल्टला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे त्विशाचे शवविच्छेदन करण्यात आले त्यावेळी एम्स रुग्णालयात बेल्ट तपासासाठी का उपलब्ध करुन देण्यात आला नाही? असा प्रश्न त्विशाच्या वकिलांनी उपस्थित केला. बेल्टशिवाय त्विशाच्या मानेवर आढळून आलेले निशाण कसे तपासले जाणार होते? असा युक्तिवाद कुटुंबियांनी केला. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने बेल्ट जप्त केला होता पण, रुग्णालयात वेळेत पाठविण्यात आला नसल्याचे भोपाळच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले. पण, त्यानंतर बेल्ट पाठविण्यात आला होता आणि यामुळे तपासात बाधा निर्माण झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शरीरावर जखमांची अपूर्ण माहिती
त्विशाच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमांची संपूर्ण माहिती शवविच्छेदन अहवालात का देण्यात आलेली नाही असा सवाल देखील तिच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला. तसेच, कुटुंबियांनी त्विशाच्या मृतदेहाची पुन्हा उत्तरीय तपासणी करण्याची मागणी केली. पोलिसांनी देखील याला सहमती दर्शवल्याची माहिती समोर आली आहे.
CCTV-FIR च्या वेळेत तफावत
याप्रकरणातील महत्वाचा अनुत्तरीत प्रश्न म्हणजे सीसीटीव्ही फुटेज आणि एफआयआरमधील वेळेचे अंतर. कोर्टात सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्विशा पायऱ्यांनी रात्री ७.२० वाजता टेरेसच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर, रात्री ८.२० वाजता तीन लोकं तिला खाली घेऊन येताना दिसत आहेत. पण, एफआयआरमध्ये तिच्या मृत्यूची वेळ रात्री १०.५० अशी नोंदविण्यात आली आहे. जवळपास तीन तासांचे अंतर कसे यावर वकिलांनी प्रश्न उपस्थित केला.
FIR मधील माहितीत चुका
एफआयआरमध्ये त्विशाच्या वयाचा उल्लेख विविध ठिकाणी वेगळा करण्यात आला आहे. काही ठिकाणी ते ३३ वर्ष तर काही ठिकाणी ३१ असे देण्यात आले आहे. तसेच, तिचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला असून, कुटुंबियांनी मात्र मृतदेह १३ मे पर्यंत रुग्णालयाच्या शवागरात असल्याचे सांगितले आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे.
त्विशाचा पती कुठंय?
त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती समर्थ सिंग यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून तो अद्याप फरार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ मे रोजी त्विशाचा मृत्यू झाला आणि १५ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. तसेच, कोर्टाने समर्थ सिंगचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच फेटाळला आहे.
