Twisha Sharma death case : भोपाळमधील त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी अनेक धागेदोर समोर येत आहेत. त्विशा शर्माच्या वडिलांनी तिच्या नवरा आणि सासूवर आरोप केल्यानंतर तिच्या सासूनेही पालकांवरच खापर फोडलं. दरम्यान, तिचा मृतदेह आढळल्यानंतर मृतदेह जिन्यवारून खाली उतरवतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

पीटीआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. सकाळी ७.२० वाजता त्विशा जिन्यांवरून वर जाताना दिसत आहे. ती जिन्यांवरून टेरेसवर जाताना दिसत आहे. त्यानंतर बरोबर एक तासांनी तीनजण तिला जिन्यांवरच सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation-छातीवर दाब देणे) देताना दिसत आहेत. यामध्ये तिचा नवरा समर्थ सिंग आणि दोघे घरातील मदतनीस आहेत.

याच व्हिडिओमध्ये तिची सासू एका खोलीत जाताना दिसतेय. त्यानंतर थोड्यावेळाने ती खोली बाहेर येऊन खालच्या मजल्यावर गेलेली दिसली. या काळात त्विशाला तिचा नवरा समर्थ जिन्यांवरच सीपीआर देत आहे. सीपीआर देण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिचा मृतदेह घेऊन तो खाली उतरतानाही दिसतोय. दरम्यान या प्रकरणानंतर समर्थ सिंग फरार झाला असून त्याला शोधून काढण्यासाठी १० हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.

त्विशा शर्माचा तिच्या राहत्या घरात मृतदेह आढळला. तिने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून यासंदर्भातील तपासणी सुरू आहे. तिच्या सासूला कोर्टाने जामीन दिला आहे. तर, तिचा नवरा फरार झाला आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचाही दावा त्विशाच्या वडिलांनी केला आहे.

त्विशाच्या सासू काय म्हणाल्या?

त्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग म्हणाल्या, “गेल्या पाच महिन्यांत त्विशाचे आई-वडील तिला एकदाही भेटायला आले नाहीत. त्विशाच्या सौंदर्यामुळे ते पैसे कमवत होते आणि आता ते तिच्या अंत्यसंस्कारालाही नकार देत आहेत. माझा तपास यंत्रणांवर आणि सत्यावर पूर्ण विश्वास आहे.” पालकांनीच त्विशाच्या करिअरवर नियंत्रण ठेवले आणि नंतर तिच्याशी संबंध तोडल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या, त्विशाच्या पालकांनी तिला लहान वयातच ग्लॅमरच्या जगात ढकलले आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडले. त्विशाने स्वतः कबूल केले होते की तिने गरोदरपणाच्या काळात मोठ्या प्रमाणात गांजाचे सेवन केले होते.” या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “त्विशा एका ‘मेंटल ट्रेनिंग प्रोग्राम’मधून (मानसिक उपचार) जात होती, आम्ही तिला पूर्ण पाठिंबा दिला. तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”