Tvisha Sharma Death Case CBI Investigation: मॉडेल, अभिनेत्री असलेल्या ३३ वर्षीय त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणामुळे देशभरात हुंडाबळीचा विषय चर्चेत आला. उच्चभ्रू, उच्चशिक्षित मानल्या जाणाऱ्या कुटुंबातही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. दरम्यान त्विशा शर्मा प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. त्विशा शर्माचे पालक आणि तिच्या पती व सासूने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणातील गूढ वाढले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून मध्य प्रदेश सरकारने सीबीआयकडे तपासाची सूत्र दिल्यानंतर तपास वेगाने सुरू झाला. त्विशा शर्माचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध घेण्यासाठी सीबीआयने तिच्या सासरच्या घरी ८० किलो वजनाचा पुतळा आणून तपासणी केली.
१२ मे रोजी त्विशा शर्मा भोपाळमधील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. घरातील सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या चित्रणानुसार त्विशाचा पती समर्थ सिंह त्विशाचा मृतदेह गच्चीवरून खाली आणताना दिसतो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो फरार होऊन थेट १० दिवसांनी पोलिसांसमोर शरण येतो. दरम्याच्या काळात त्विशाच्या सासू गिरीबाला सिंह या त्विशाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील, अशाप्रकारची विधाने करतात. यामुळे सामान्यांपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली होती.
त्विशा शर्माचा खून करण्यात आला, असा आरोप त्विशा शर्माच्या वडिलांनी केला होता. हुंड्याच्या कारणास्तव त्विशाचा छळ केला जात होता, असाही आरोप त्यांनी केला. या आरोपाचा तपास करण्यासाठी सीबीआयने त्विशाच्या सासरी ८० किलो वजनाचा पुतळा आणला आणि त्विशाच्या अखेरच्या क्षणी नेमके काय झाले, याची चाचपणी केली. आरोपी आणि इतर साक्षीदारांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्विशाच्या वजनाशी साधर्म्य असलेला पुतळा तयार करण्यात आला.

त्विशा शर्माने लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या काळातच स्वतःचे जीवन संपवले. त्यामुळे या प्रकरणाकडे अनेकांनी संशयाच्या नजरेने पाहिले. पोलिसांनी सदर पुतळा घटनास्थळी आणून १२ मे रोजी रात्री नेमके काय घडले? त्या प्रसंगाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. त्या रात्री घरी उपस्थित असलेल्यांनी जबाब दिला, त्यानुसार घटनेची पुनर्रचना करण्यात आली.
घटनेची पुनर्रचना म्हणजे काय?
गुन्हा घडलेल्या घटनास्थळावर पुन्हा गुन्ह्याची पुनर्रचना करणे, हे तंत्र आता फॉरेन्सिक यंत्रणेद्वारे वापरण्यात येणारे प्रमाणित तपासाचे सूत्र आहे. या तंत्राद्वारे साक्षीदार आणि आरोपींनी जे जबाब दिले, त्याची भौतिकदृष्ट्या शक्यता काय किंवा ते प्रत्यक्ष प्रसंग, गुन्ह्याची व्याप्ती, जखमा आणि उपलब्ध असलेल्या पुराव्यांशी मेळ खात आहेत का? हे तपासले जाते.
घटनेची पुनर्रचना करत असताना तपासकर्त्यांकडून घरात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती करण्यात येते. ज्यामध्ये घटनाक्रम घडलेला कालावधी, त्याबरोबर घडलेल्या इतर घटना, आरोपी आणि प्रत्यक्षदारांनी जी माहिती दिली, त्यानुसार घडलेल्या घटना सुसंगत आणि तर्कसंगत आहेत का? याची चाचपणी केली जाते.
पुनर्रचनेद्वारे त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सर्वात वादग्रस्त ठरलेल्या प्रश्नांना हात घातला जाणार आहे. जसे की, त्विशा शर्माने नेमक्या कोणत्या ठिकाणी गळफास घेतला? तिचा मृतदेह खाली कुणी उतरवला? मृतदेह खाली कसा आणला गेला, त्यावेळी कुटुंबातील सदस्यांची परिस्थिती कशी होती? आरोपींनी जी माहिती दिली, ती फॉरेन्सिक आणि वैद्यकीय पुराव्यांशी मेळ खात आहे का? या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

आरोपींनी दिलेली माहिती प्रत्यक्षात किती खरी आहे, याचाही तपास यंत्रणेकडून होणार आहे. ज्यामध्ये त्यांनी बचावासाठी केलेले प्रयत्न, तसेच घरात त्यांनी मृतदेह कशाप्रकारे हाताळला आणि घटना कळल्यानंतर ते रुग्णालयात मृतदेह घेऊन जाण्यापर्यंत कोणत्या घटना घडल्या? याचा शोध घेतला जाईल.
गिरीबाला सिंह यांचा जामीन फेटाळल्यानंतर गंभीर वळण
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्विशा शर्माच्या सासू गिरीबाला सिंह यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावल्यानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण प्राप्त झाले. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. साक्षीदारांचे जबाब, व्हॉट्सॲप चॅट्स, त्विशा शर्मा गर्भवती असल्याची माहिती आणि शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेल्या मृत्यूपूर्वीच्या अनेक जखमा विचारात घेतल्या नसल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला.
‘मिस पुणे’ त्विशा शर्माचे स्वप्न अपूर्ण राहिले
एमबीए पदवीधर असलेली त्विशा शर्मा ही मूळची नोएडा होती. तिने २००९ ते २०१२ दरम्यान मॉडलिंग क्षेत्रात प्रेवश केला. कठोर परिश्रम, ग्रुमिंग आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिस पुणे सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. हा तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण, यानंतरच तिच्यासाठी जाहिरात, मॉडलिंग आणि अभिनयाची दारे खुली झाली. त्विशाने व्यावसायिक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. तसेच तेलुगू चित्रपटांतूनही ती झळकली. ‘मुग्गुरु मोनागल्लू’हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता. तर, २०१८ मध्ये तिने ‘जरा संभल के’ (Zara Sambhal Ke) नावाच्या लघुपटातही काम केले होते.
अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात त्विशाला बरेच काम करायचे होते. मात्र तत्पूर्वी १२ मे रोजी ती मृतावस्थेत आढळली. तिच्या कुटुंबीयांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. भोपाळ एम्समध्ये पहिले शवविच्छेदन झाले, ज्यात गळफास घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर हुंडा, पुराव्यांशी छेडछाड आणि वादग्रस्त डिजिटल पुरावे समोर आल्यानंतर हे प्रकरण प्रसिद्धीस आले.
त्विशाचा पती समर्थ सिंह आणि सासू गिरीबाला सिंह हे दोघेही सध्या सीबीआय कोठडीत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम ८० (२), ८५ आणि ३ (५) नुसार हुंडा बळी, पती किंवा सासरच्या नातेवाईकांकडून होणारा छळ, तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
