Twisha Sharma Death Case Mother-In-Law Statement : भोपाळमधील कटारा हिल्स परिसरात ३३ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्मा या विवाहित तरुणीचा १२ मे रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं असून याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. लग्न झाल्यापासून त्विशाचा छळ सुरू होता, असा आरोप त्विशाच्या पालकांनी केला असून त्यांच्याकडून त्विशाला मारहाणही होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे हुंडाबळीचं प्रकरण असल्याचाही त्यांनी दावा केला आहे. दरम्यान, या सर्व वादांवर आता त्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी त्विशाच्या मानसिक आरोग्य आणि तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत अनेक गंभीर दावे केले आहेत. त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला.

गरोदरपणात त्विशाने गांजाचे सेवन केले होते

गिरीबाला सिंग म्हणाल्या, “गेल्या पाच महिन्यांत त्विशाचे आई-वडील तिला एकदाही भेटायला आले नाहीत. त्विशाच्या सौंदर्यामुळे ते पैसे कमवत होते आणि आता ते तिच्या अंत्यसंस्कारालाही नकार देत आहेत. माझा तपास यंत्रणांवर आणि सत्यावर पूर्ण विश्वास आहे.” पालकांनीच त्विशाच्या करिअरवर नियंत्रण ठेवले आणि नंतर तिच्याशी संबंध तोडल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या, त्विशाच्या पालकांनी तिला लहान वयातच ग्लॅमरच्या जगात ढकलले आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडले. त्विशाने स्वतः कबूल केले होते की तिने गरोदरपणाच्या काळात मोठ्या प्रमाणात गांजाचे सेवन केले होते.” या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “त्विशा एका ‘मेंटल ट्रेनिंग प्रोग्राम’मधून (मानसिक उपचार) जात होती, आम्ही तिला पूर्ण पाठिंबा दिला. तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”

त्विशाची मानसिक स्थिती बरी नव्हती

त्या पुढे म्हणाल्या, “हे आमच्यासाठी मोठं नुकसान आहे, कारण परिस्थिती काहीही असली तरी ती आमच्या कुटुंबाचा भाग होती. ती मानसोपचार तज्ज्ञांकडे समुपदेशनासाठीही जात होती. तिला स्किझोफ्रेनिया (एक गंभीर मानसिक आजार) च्या रुग्णाला दिली जाणारी औषधे लिहून दिली होती. औषधांमुळे ती एखादा दिवस बरी राहायची, पण नंतर तिच्या प्रकृतीत पुन्हा बदल व्हायचा. आम्ही तिच्यात काही शारीरिक लक्षणे पाहिली होती, जसे की तिचे हात थरथरायचे, जे सहसा ड्रग्स सोडल्यानंतरच्या लक्षणांमध्ये (withdrawal symptoms) घडते. तिने सर्व काही उद्ध्वस्त केले.”

गर्भपाताबाबत सासूचे दावे

गिरीबाला सिंग यांनी असाही दावा केला की त्विशाने गर्भपाताची (MTP) प्रक्रिया सुरू केल्यानंतर पश्चात्ताप व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या, “जेव्हा तिने गर्भपाताचा पहिला डोस घेतला, तेव्हा तिने हा निर्णय मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण हे शक्य नव्हते. तिने आम्हाला आनंदाचा तो क्षणही अनुभवू दिला नाही. हे खरोखरच हृदयद्रावक आहे; आजकाल तरुण मुली अनेकदा असे टोकाचे पाऊल उचलतात. ७ मे रोजी तिने गोळी घेतली असावी; तिने गर्भपाताची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि आम्हाला तिला पाठिंबा द्यावा लागला.”

त्विशाच्या जीवावर तिचे पालक पैसे कमवत होते

त्विशाच्या वडिलांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत सासू म्हणाल्या, “मी तिच्या आईलाही बोलावले होते, कारण तिची तिथे गरज होती. पण पाच महिने तिचे पालक आले नाहीत. आम्ही तिच्या वडिलांना मुद्दाम बोलावले नाही, कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप विचित्र आहे. गेली वीस वर्षे ते फार्मास्युटिकल (औषध) उद्योगात, विशेषतः कझाकस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये काम करत आहेत; तिथूनच अनेक गोष्टींचा पुरवठा होण्याची शक्यता असू शकते. मला वाटते की ते तिच्या जीवावरच पैसे कमवत होते. पण आता हे प्रकरण न्यायालयात आहे.”

दरम्यान, त्विशाच्या सासरचे लोक तिच्या माहेरच्यांकडे पैसे मागत होते. त्यामुळे हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचं म्हटलं जातंय. यावर त्विशाच्या सासूने ५ हजार ते ५० हजार रुपयांच्या व्यवहारांचे स्टेटमेंट्सही पत्रकार परिषेदत सादर केले. हे पैसे त्विशाला तिच्या नियमित गरजांसाठी दिले गेले होते, असा दावा सासूने केला आहे.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने गिरीबाला सिंग यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, तर त्यांचा मुलगा समर्थ याचा जामीन फेटाळला होता. यानंतर, भोपाळ पोलिसांनी समर्थच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. यावर बोलताना ट्विशाचे वडील नवनीधी शर्मा यांनी ‘पीटीआय’ (PTI) ला सांगितले की, जामीन फेटाळणे हे न्यायाच्या दिशेने टाकलेले केवळ एक अर्धवट पाऊल आहे; खरा विजय तेव्हाच होईल जेव्हा दोघांनाही शिक्षा मिळेल. त्यांनी पती आणि निवृत्त न्यायाधीश (सासू) या दोघांनाही त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.