Twisha Sharma Case Chargesheet File : केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ सिंग यांच्याविरुद्ध त्याची पत्नी त्विशा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. माजी न्यायाधीश आणि त्यांच्या वकील मुलावर हुंडा आणि छळाचे आरोप आहेत. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांनी, १२ मे रोजी भोपाळमधील तिच्या पतीच्या घरी त्विशा शर्मा मृतावस्थेत आढळली होती. ती ३३ वर्षांची होती.
आरोपपत्रात कोणती कलमं लावली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ६३६ पानांच्या दोषारोपपत्रात हुंडाबळी, वैवाहिक क्रूरता, आत्महत्येस प्रवृत्त करणं आणि समान गुन्हेगारी हेतूने केलेल्या कृतींशी संबंधित कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. त्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता, तसंच तिच्या सासरच्या लोकांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं. एफआयआर नोंदवल्यानंतर समर्थ सिंग सुरुवातीला पोलिसांना सापडत नव्हता, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याला २२ मे रोजी जबलपूरमधून अटक करून भोपाळला आणण्यात आलं. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि समर्थ सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिच्या मृत्यूच्या वेळेस त्याचा मोबाईल फोनचा वापर, डिजिटल संपर्क आणि घडामोडींचे विश्लेषण करण्यात आलं.
सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती स्वतःहून दखल
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासाचे आदेश दिल्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या. तोपर्यंत मध्य प्रदेश सरकारनेही सीबीआय तपासाची शिफारस केली होती. या प्रकरणात शवविच्छेदन अहवालाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या नोंदींनुसार, मृत्यूचं कारण फाशी असल्याचे सांगण्यासोबतच त्विशा शर्माच्या शरीरावर जखमांच्या सहा खुणा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. या जखमा कशामुळे झाल्या, याबाबत प्रश्न निर्माण झाले आणि हा तपासाचा एक महत्त्वाचा पैलू बनला.
त्विशा शर्माच्या कुटुंबाच्या मागणीनंतर दुसरे शवविच्छेदन करण्यात आले आणि वैद्यकीय व फॉरेन्सिक तपास पुढे नेण्यात आला. तपासात ‘जिम्नॅस्टिक्स बेल्ट’ देखील एक महत्त्वाचा घटक ठरला. हा बेल्ट नंतर जप्त करण्यात आला आणि त्याचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात आले. आरोपींनी सांगितलेला घटनाक्रम – विशेषतः मृतदेह फासावरून खाली उतरवणे आणि बेल्ट सोडवणे प्रत्यक्षात शक्य होते की नाही, हे सीबीआयला निश्चित करायचे होते. यासाठी सीबीआयने तिच्या सासरच्या घरी गुन्ह्याच्या दृश्याची पुनर्निर्मिती केली.
त्विशा शर्माच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८०(२), ८५ आणि ३(५) तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत सुरुवातीला एफआयआर नोंदवण्यात आला होता. कलम ८०(२) हुंडाबळीशी संबंधित आहे, कलम ८५ महिलेवर तिच्या पतीकडून किंवा नातेवाकांकडून होणाऱ्या क्रूरतेशी संबंधित आहे, तर कलम ३(५) हे एकापेक्षा जास्त व्यक्तींनी समान गुन्हेगारी हेतूने केलेल्या कृतींशी संबंधित आहे. सीबीआयच्या दोषारोपपत्रात बीएनएसच्या कलम १०८ चा देखील समावेश आहे, जे आत्महत्येस प्रवृत्त करण्याशी संबंधित आहे.
