त्विशा शर्माचा मृत्यू अनैसर्गिक आणि दुर्दैवी आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. त्विशा शर्माच्या मृत्यूचं प्रकरण हे फक्त स्थानिक अपराधांच्या प्रकरणाप्रमाणे मर्यादित नाही. तर राष्ट्रीय स्तरावर हा विषय चर्चिला जातो आहे. १२ मे रोजी त्विशा शर्माचा मृतदेह तिच्या सासरी आढळून आला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या उपस्थितीत सुनावणी करण्यात येत आहे. अशात आता सर्वोच्च न्यायालयाने हे मत नोंदवलं आहे. तपास यंत्रणांकडून हा शोध घेतला जातो आहे की त्विशाचा मृत्यू हा आत्महत्याच होती की हुंड्यासाठी छळ करुन तिला कट करुन मारलं गेलं किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं हे तपासलं जातं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काय काय म्हटलं आहे?
सर्वोच्च न्यायालयाने त्विशा शर्मा या अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने जो दुसऱ्यांदा शवविच्छेदनासाठी त्वरित आदेश दिला ही बाब चांगली आहे.
प्रसार माध्यमांनी या प्रकरणाचं वार्तांकन करत असताना संयम आणि जबाबदारी ओळखून ते करावं.
सुनावणीच्या दरम्यान आरोपी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला हा विश्वास दिला की माजी न्यायमूर्ती आणि त्विशा यांच्या सासूबाई गिरीबाला यांच्याबाबत कुठलंही वक्तव्य केलं जाणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितलं की हे प्रकरण संवेदनशील आहे. सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात आलं आहे.
त्विशाचा मृत्यू ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे आणि या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थपणे चौकशी झाली पाहिजे.
माध्यमांना आमची ही विनंती आहे की त्विशा शर्माच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया कॅमेरावर रेकॉर्ड करु नये. त्यांचा साऊंड बाईट चालवावा.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काय म्हटलं आहे?
- त्विशाच्या मृत्यूचं प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आलं त्याचं आम्हाला दुःख आहे.
- या प्रकरणाची स्वतंत्र एजन्सीकडून तपासणी केली पाहिजे.
- न्यायव्यवस्था या सगळ्या प्रकरणात दखल देत असल्याचं भासवलं जातं आहे हे योग्य नाही.
- आम्ही सीबीआय चौकशीचा आदेश देणार नाही, मात्र लवकरात लवकर योग्य ती पावलं उचलली पाहिजेत.

तुषार मेहतांच्या वक्तव्यानंतर सूर्यकांत काय म्हणाले?
तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात म्हणाले की सीबीआयकडे त्विशाच्या मृत्यूचं प्रकरण सोपवलं जाईल. ज्यानंतर CJI सूर्यकांत म्हणाले की मला आशा आहे की सीबीआयचा तपास लवकर पूर्ण होईल ही अपेक्षा आहे. तसंच माझं दोन्ही पक्षकारांना सांगणं आहे की मीडियामध्ये जाऊन वक्तव्यं करु नका. CBI वर विश्वास ठेवा.
१२ मे रोजी काय घडलं?
त्विशा शर्माचा मृतदेह तिच्या राहत्या घरी म्हणजेच तिचा नवरा समर्थच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्विशाच्या वडिलांनी आणि भावाने हा आरोप केला की त्विशा शर्माची हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे. तिचा मानसिक छळ सुरु होता. तसंच हुंड्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. मला घरी यायचं आहे, तुम्ही इथे येऊन मला घेऊन जा असं त्विशा सांगत होती असंही तिच्या वडिलांनी म्हटलं. त्विशाच्या वडिलांनी हा आरोप केला की त्विशाची सासू गिरीबाला सिंग या निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी त्विशाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात त्यांच्या माहितीतल्या कायदेशीर तज्ज्ञांना फोन केले होते. त्विशा शर्माने आत्महत्या केली नसून तिच हत्या करण्यात आली आहे. तसंच तिचा नवरा समर्थही यात सहभागी आहे त्यामुळेच तो घर सोडून पळाला आहे. त्विशाच्या सासूने घरातल्या सीसीटीव्ही फुटेजचीही छेडछाड केली आहे असाही आरोप त्विशाच्या वडिलांनी केला. त्विशाच्या सासूबाई गिरीबाला सिंग या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहेत. दरम्यान या आरोपांनंतर त्विशाच्या सासूनेही तिच्यावर आरोप केले होते

गिरीबाला सिंग यांनी काय आरोप केले होते?
गिरीबाला सिंग म्हणाल्या होत्या, “गेल्या पाच महिन्यांत त्विशाचे आई-वडील तिला एकदाही भेटायला आले नाहीत. त्विशाच्या सौंदर्यामुळे ते पैसे कमवत होते आणि आता ते तिच्या अंत्यसंस्कारालाही नकार देत आहेत. माझा तपास यंत्रणांवर आणि सत्यावर पूर्ण विश्वास आहे.” पालकांनीच त्विशाच्या करिअरवर नियंत्रण ठेवले आणि नंतर तिच्याशी संबंध तोडल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या, त्विशाच्या पालकांनी तिला लहान वयातच ग्लॅमरच्या जगात ढकलले आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडले. त्विशाने स्वतः कबूल केले होते की तिने गरोदरपणाच्या काळात मोठ्या प्रमाणात गांजाचे सेवन केले होते.” या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “त्विशा एका ‘मेंटल ट्रेनिंग प्रोग्राम’मधून (मानसिक उपचार) जात होती, आम्ही तिला पूर्ण पाठिंबा दिला. तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परिस्थिती काहीही असली तरी ती आमच्या कुटुंबाचा भाग होती. ती मानसोपचार तज्ज्ञांकडे समुपदेशनासाठीही जात होती. तिला स्किझोफ्रेनिया (एक गंभीर मानसिक आजार) च्या रुग्णाला दिली जाणारी औषधे लिहून दिली होती. औषधांमुळे ती एखादा दिवस बरी राहायची, पण नंतर तिच्या प्रकृतीत पुन्हा बदल व्हायचा. आम्ही तिच्यात काही शारीरिक लक्षणे पाहिली होती, जसे की तिचे हात थरथरायचे, जे सहसा ड्रग्स सोडल्यानंतरच्या लक्षणांमध्ये घडते. तिने सर्व काही उद्ध्वस्त केले.”
या सगळ्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान CJI सूर्यकांत यांनी हे सांगितलं की सदर प्रकरण संवेदनशील आहे. प्रसारमाध्यमांनाही सरन्यायाधीशांनी भान बाळगा असं आवाहन केलं आहे.
