Jitu Munda Case Odisha: सरकारी यंत्रणा, बँक किंवा शासनाचा विभाग ग्रामीण आणि दुर्गम भागात किती उदासीन आणि मृतावस्थेत असतो, याचा पुरावा काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये दिसून आला. मुर्दाड झालेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी ओडिशाच्या केओन्झार जिल्ह्यातील आदिवासी रहिवासी जितू मुंडा यांनी धक्कादायक पाऊल उचलले. निधन पावलेल्या बहिणीच्या खात्यातील रक्कम काढता यावी, यासाठी बँकेत अनेकदा खेपा मारल्या. पण कागदपत्रांची पूर्तता कशी करायची? नॉमिनी, मृत्युपत्र याची माहिती न मिळाल्यामुळे आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्यामुळे जितू मुंडा यांनी आपल्या बहिणीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो बँकेच्या दारात नेऊन ठेवला. मृतदेह खांद्यावर घेऊन जात असतानाचा त्यांचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला. त्यानंतर झोपलेली व्यवस्था खडबडून जागी झाली.
केओन्झार जिल्ह्यातल्या दियानली गावतील रहिवासी असलेले जितू मुंडा आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. बँकेच्या दारात त्यांनी बहिणीचा मृतदेह ठेवल्यानंतर बँकेने मुंडा यांच्यावरच आरोप केले. ते यापूर्वी कधीच बँकेत आले नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र राज्य सरकारने केलेल्या चौकशीत बँकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे.
ओडिशाच्या उत्तर विभागाचे महसूल आयुक्त संग्राम केशरी मोहपात्रा यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि मी बँकेतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन तपासले आहे. त्यात बँकेची प्रथमदर्शनी चूक असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही चित्रीकरण आवाजाविना असल्यामुळे नेमके संभाषण काय झाले, हे कळत नसले तरी बँक कर्मचारी आणि मुंडा यांच्या शारीरिक हालचालीवरून बँकेची चूक असल्याचे दिसून येत आहे.

दियानली गावतील रहिवासी जितू मुंडा (वय ५९ वर्ष) सोमवारी (२७ एप्रिल) आपल्या बहिणीचा मृतदेह घेऊन ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेबाहेर पोहोचले. त्यांच्या बहिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर जमिनीत पुरलेला मृतदेह त्यांनी बाहेर काढला आणि गोणीत भरून बँकेसमोर आणून ठेवला. बहिणीच्या खात्यात असलेली १९,३०० रुपयांची रक्कम आपल्याला मिळावी, असी त्यांची मागणी होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने चौकशी सुरू केली.
महसूलचे विभागीय आयुक्त मोहपात्रा यांनी सांगितले की, बँकेकडे वारंवार फेऱ्या मारूनही मुंडा यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी हे पाऊल उचलले. “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, जितू मुंडा हे सकाळी ११.२६ ते ११.५८ पर्यंत बँकेत होते. या काळात ते बँक व्यवस्थापकांना दोनदा भेटले. कॅशियर आणि बँक मित्र सारख्या इतर कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. पण कुणाकडूनही मदत न मिळाल्यामुळे ते व्यथित होऊन परतले. त्यानंतर त्यांनी पार्थिव आणण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.
भावा-बहिणीला ओळखत असूनही बँकेकडून निष्काळजीपणा
आयुक्तांनी पुढे सांगितले की, बँकेचे अधिकारी जितू मुंडा आणि त्यांची निधन पावलेली बहीण कालरा मुंडा या दोघांनाही ओळखत होते. कालरा मुंडा या अनेकदा जितू मुंडा यांच्यासह बँकेत आल्या होत्या. २६ डिसेंबर २०२५ रोजी दोघे शेवटचे एकत्र बँकेत आले होते. तेव्हा त्यांनी बँकेतून ५०० रुपये काढले. त्यानंतर महिन्याभराने कालरा मुंडा यांचा मृत्यू झाला.
मोहपात्रा पुढे म्हणाले की, बँक अधिकाऱ्यांनीच मान्य केल्यानुसार दोघेही सख्खे भाऊ-बहीण आहेत, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी मुंडा यांच्याशी सौजन्याने वागणे अपेक्षित होते. बँकेकडून स्पष्टपणे निष्काळजीपणा झाल्याचे दिसत आहे, हे मी माझ्या अहवालात नमूद केले.

बँकेने काय दावा केला होता?
जितू मुंडा यांची दखल सरकारने घेतल्यानंतर बँकेनेही सारवासारव करत आपली बाजू मांडली. बँकेने दावा केला की, जितू मुंडे सोमवारी पहिल्यांदाच बँकेत आले. कालरा मुंडा यांचे ते कायदेशीर वारस असल्याचा कोणताही पुरावा किंवा मृत्यूपत्र सादर न करता त्यांनी पैसे काढण्याची विनंती केली. बँकेच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सत्यब्रता नंदा यांनी जितू मुंडा यांच्यावरच आरोप केले. त्या म्हणाल्या, जितू मुंडा यांचे आरोप निराधार आहेत. ते यापूर्वी कधीही बँकेत आले नव्हते. तसेच बहिणीचा सांगाडा घेऊन आले तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते.
मृत्यूपत्र आणि वारसा प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारकडून हालचाल
पण मोहपात्रा यांच्या चौकशीत नेमकी उलट परिस्थिती समोर आली. मुंडा यांना बँकेचा व्यवहार कसा असतो, याची प्राथमिक माहिती होती. जसे की, पैसे काढण्यासाठी कुठे जायचे? स्लीप भरल्यानंतर ती कुणाकडे द्यायची. वगैरे.
A man in Odisha dug up his deceased sister’s grave and brought her skeleton to the bank Just to prove she had died.
— Woke Eminent (@WokePandemic) April 28, 2026
He had been trying to withdraw ₹20,000 from her account, but bank officials kept insisting he bring the account holder in person. Despite repeatedly telling them… pic.twitter.com/hICEqwvPFu
सोमवारी ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारने कालरा मुंडा यांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि जितू मुंडा हे कायदेशीर वारस असल्याचे प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली. तसेच रेड क्रॉस निधीमधून जितू मुंडे यांना ३०,००० रुपयेदेखील दिले.
विरोधकांचे सरकारवर आरोप
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सदर घटनेमुळे ओडिशाची मान शरमेने खाली गेली असल्याचे ते म्हणाले. “बँकेतून हक्काचे पैसे काढण्यासाठी एका महिलेचा सांगाडा तिच्या भावाला बँकेत घेऊन जावा लागला. जितू मुंडा यांनी बँकेचे अनेकदा खेटे घातल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास दिला”, अशा शब्दात पटनायक यांनी विधानसभेत आपली नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, जितू मुंडा यांनी बहिणीचा सांगाडा बँकेत आणल्यानंतर त्यांना पुन्हा तो खांद्यावर टाकून पायीच घरी जावे लागले. हे त्याहून धक्कादायक आहे. हा असंवेदनशीलतेचा कळस असून यातून प्रशासनाची उदासीनता दिसून येते.
