नवी दिल्ली : ट्विटर हे समाजमाध्यम गुरुवारी सकाळी तब्बल ४० मिनिटे ठप्प झाले. ‘ट्विटर’च्या काही वापरकर्त्यांना गुरुवारी सकाळी समस्यांचा सामना करावा लागला. ‘आता ट्वीट होत नाहीत, नंतर प्रयत्न करा’ असा संदेश त्यांना येत होता. यानंतर ‘ट्विटर डाऊन’ असा हॅशटॅग आघाडीवर होता. भारतासह अनेक देशातील वापरकर्त्यांनी ट्वीट करता येत नाहीत, अशी तक्रार केली.

अमेरिकेतीलज सुमारे २७ हजार जणांनी ट्विटर कार्यरत नाही, अशी तक्रार केली. न्यूयॉर्क, सन फ्रान्सिस्कोसह अनेक शहरातील वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. ब्रिटन, ब्राझिल आणि इटलीसह अनेक देशातील ट्विटरच्या वापरकर्त्यांनीही तक्रार केली.

‘डाउनडिटेक्टर’च्या म्हणण्यानुसार भारतातील दिल्ली, मुंबई, हैदराबादसह अनेक मोठय़ा शहरात ट्विटर वापरकर्त्यांना सकाळी ट्वीट करता आले नाहीत. संकेतस्थळ आणि अ‍ॅप अशा दोन्ही माध्यमांमध्ये ही समस्या होती. काहींना तर ‘लॉग इन’ करता येत नव्हते. फेब्रुवारी महिन्यातही ट्वीटर काही मिनिटांसाठी ठप्प झाले होते.

खोचक टीका..

ट्विटरने काम करणे बंद केल्यानंतर समाज माध्यमांवर अनेकांनी खोचक टीका केली. अनेक ‘मीम्स’ही प्रसारित झाले. काही वापरकर्त्यांनी त्यांची समस्या परस्परांना कळविली. या संदर्भात ‘ट्वीट सपोर्ट’ने एक ट्वीट करून वापरकर्त्यांना समस्यांचा सामाना करावा लागत आहे, हे मान्य करत काही वेळात सेवा सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली होती.