ट्विटर या लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग कंपनीनं सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा दाखवला होता. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ट्विटरने हा नकाशा मागे घेतला. या नकाशामध्ये जम्मू व काश्मीर आणि लडाख हे भारताचाच भाग न दाखवता स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून, एफआयआरमध्ये ट्विटर इंडियाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या नावाचाही समावेश आहे.

‘ट्वीट लाईफ’ या शीर्षकाखाली ट्विटरच्या वेबसाईटवरील करिअर विभागात हा नकाशा दिसत होता. नेटिझन्सनी याचा निषेध करत ट्विटरवर कठोर कारवाईची मागणी केली होती. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग दाखवला होता. या मुद्यावर ट्विटरला पाठवलेल्या ई-मेलला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा- धर्मेंद्र चतुर यांच्या राजीनाम्यानंतर जेरेमी केसल यांची ट्विटरच्या विशेष अधिकारीपदी नियुक्ती

दरम्यान, याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा नगर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्यासह न्यूज पार्टनरशिप हेड अम्रिता त्रिपाठी यांना सहआरोपी करण्यात आलं आहे.

हेही वाचा- ट्विटरकडून पु्न्हा मोठी चूक; नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवले भारतापासून वेगळे!

ट्विटर या अमेरिकेतील बड्या कंपनीचा भारत सरकारशी संघर्ष सुरू आहे. वारंवार आठवण देऊनही ट्विटरने देशाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांचं उल्लंघन केलं आहे किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे, असा ठपका सरकारने ठेवला आहे. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याची ही कृती या कंपनीला प्रकाशक म्हणून कायदेशीर उत्तरदायी ठरविण्यास पुरेशी होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.