चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई या मागील काही दिवसांपासून वादात सापडला आहे. त्यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टवरुन वाद निर्माण झाला असून या प्रकरणामध्ये आता ट्वीटरनेही त्याचं वादग्रस्त ट्वीट हटवलं आहे. कालीमातेच्या हातामध्ये सिगारेट पकडलेल्या फोटोमुळे सध्या मनिमेकलाई यांच्यावर टीका केली जात असतानाच त्यांनी आता एक नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटची कॅप्शन अवघ्या एका शब्दाची आहे.

नक्की वाचा >> Kaali Poster Row : कालीमातेच्या पोस्टर प्रकरणात शिवसेनेची उडी; प्रवक्त्या म्हणाल्या, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ हिंदू…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनिमेकलाई यांनी आज सकाळी सव्वा सात वाजता एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये भगवान शंकर आणि देवीची वेशभूषा केलेल्या दोन व्यक्ती सिगारेट ओढत असल्याचं दिसत आहे. या फोटोला मनमेकलाई यांनी ‘इतरत्र’ अशा अर्थाची कॅप्शन दिलीय. मनिमेकलाई यांच्या माहितीपटाच्या वादग्रस्त पोस्टरशी साधर्म्य साधणारा हा फोटो असल्याचं दिसून येत आहे.

गुन्हे दाखल
कॅनडातील टोरंटो येथे राहणाऱ्या मणिमेकलाई यांनी माहितीपटासंबंधीचा पोस्टर प्रसिद्ध केलं होतं. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. कालीमातेचा अपमान मनिमेकलाई माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकांनी केलाय. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी वादग्रस्त ‘ट्वीट’मुळे मणिमेकलाईविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. 

पाहा व्हिडीओ –

ट्वीट हटवलं…
‘ट्वीटर’ने चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांचे वादग्रस्त ‘ट्वीट’ काढून टाकले आहे. २ जुलै रोजीचं हे ट्वीट कायदेशीर मागणीनुसार हे ‘ट्वीट’ भारतात दाखवले जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी करत ट्वीट हटवण्यात आलं आहे. ‘ट्वीटर’ने हे ‘ट्वीट ’कधी हटवले, हे स्पष्ट झालेले नाही.

कुठे दाखवण्यात आलेलं हे पोस्टर…
ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी कॅनडातील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कॅनडाच्या अधिकाऱ्यांना चित्रपटाशी संबंधित ‘प्रक्षोभक बाबी’ काढून टाकण्याचे आवाहन केले होते.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्राही अडचणीत
दरम्यान याच प्रकरणावरुन भाष्य केल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्राही अडचणीत आल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बुधवारी महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध देवी कालीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या पश्चिम बंगाल शाखेने मोईत्रा यांच्या अटकेची मागणी केली. हिंदू देवतांचा अवमान करण्याची पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे का, असाही सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

मोईत्रा यांनी यावर दिलेल्या  प्रत्युत्तरात म्हटले आहे, की त्या ‘देवीच्या उपासक’ आहेत आणि भाजपच्या गुंडगिरीला आपण घाबरत नाही. त्या म्हणाल्या, की सत्याला कुठल्याही कुबडय़ा घेण्याची  गरज नसते. भाजपवर ताशेरे ओढत मोईत्रा यांनी ‘ट्वीट’मध्ये ‘जय माँ काली. बंगालवासीय जिची पूजा करतात. ती धैर्यवान देवी आहे.’ असे नमूद करून म्हटले, की मी काली देवीची उपासक आहे. मला कशाचीच भीती वाटत नाही. तुमच्या गुंडांची, तुमच्या पोलिसांची आणि विशेषत: तुमच्या ‘ट्रोल्स’ची भीती वाटत नाही.

More Stories onहिंदूHindu
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter removes filmmaker leena manimekalai kaali poster tweet she tweeted new one scsg
First published on: 07-07-2022 at 09:58 IST