अमेरिकेतील कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी डेन्व्हरमध्ये दोन छोट्या विमानांची हवेतच समोरासमोर धडक झाली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. बोल्डर काउंटी शेरीफच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, एका विमानाच्या अवशेषांमध्ये दोन लोक मृतावस्थेत आढळले आहेत. तर दुसऱ्या अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांमध्ये अन्य एका व्यक्तीचा मृतदेह मलबात वेगळ्या ठिकाणी आढळला आहे.

‘माउंटन व्ह्यू फायर रेस्क्यू’ने तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील काही रस्ते बंद केले आहेत. वृत्तसंस्था ‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटनेत मृत पावलेल्या लोकांची अद्याप ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा- मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानानं धावपट्टीवरच घेतला पेट, पाहा VIDEO

दोन विमानांची हवेत अशा प्रकारे समोरासमोर धडक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना होती की आणखी काही? याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ने ट्विटरवर शेअर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, कोलोरॅडो राज्यातील लॉन्गमॉन्टजवळ सेसना १७२ आणि सोनेक्स जेनोस विमाना या दोन विमानांची हवेत टक्कर झाली आहे.

हेही वाचा- …अन् मृत्यूशी झुंज संपली; कॅनडातील गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यानं घेतला अखेरचा श्वास

डेन्व्हरच्या उत्तरेस ५० किलोमीटर अंतरावर लॉंगमॉन्टजवळ हा अपघात घडला आहे. ‘सेसना १७२’ हे विमान ‘स्कायहॉक’ म्हणूनही ओळखले जातं. हे विमान जगातील सर्वात लोकप्रिय विमानांपैकी एक आहे. या विमानात चार व्यक्ती बसू शकतात. हे विमान सामान्यतः फ्लाइट इंस्ट्रक्शनसाठी वापरले जाते. अमेरिकेतील विमान वाहतूक नियमांनुसार, खासगी वैमानिकांना टेकऑफ आणि लँडिंग प्रक्रियेचे बारकाईने पालन करावे लागते.