पंजाबमधील लुधियानाच्या गिल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुचा राम लढार यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या संबंधात पोलिसांनी सोमवारी एका शेतकरी संघटनेच्या नेत्यासह दोघांना अटक केली. सेवानिवृत्त सनदी अधिकारी असलेले ६३ वेर्षांचे लढार हे रविवारी सायंकाळी त्यांच्या मतदारसंघातील प्रचारानंतर एका खेडय़ावरून परत येतत्सताना त्यांच्या मोटारीवर हल्ला करण्यात आला. यात जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लुधियाना पोलिसांनी या प्रकरणी किसान युनियन एकता (उग्रहण) या संघटनेचे मंडळ प्रमुख जगिवदर सिंग राजू आणि लवजित सिंग यांच्यासह २० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून राजू व लवजित या दोघांना अट केली आहे. लढार यांच्या तक्रारीच्या आधारे खुनाचा प्रयत्न व इतर आरोपांखाली फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी उशिरा सायंकाळी लढार हे खेरी खेडय़ात त्यांच्या एका समर्थकाच्या घरी बैठकीला संबोधित करत असताना आरोपी तेथे आले आणि त्यांनी बैठक उधळण्याचा प्रयत्न केला, असे लढार यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी आपल्याविरुद्ध जातीय शेरेबाजी केल्याचा आरोपही त्यांनी केला. या बैठकीनंतर लढार त्यांच्या मोटारीत बसून या खेडय़ातून निघाले असता आरोपींनी त्यांचे वाहन अडवले आणि काठय़ा- विटांसह मोटारीवर हल्ला केला.