सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे राज्य सचिव के एस शान यांच्या अलाप्पुझा येथे शनिवारी रात्री झालेल्या हत्येप्रकरणी केरळ पोलिसांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दोन कार्यकर्त्यांना अटक केली. अलप्पुझाचे पोलीस अधीक्षक (एसपी) जी जयदेव म्हणाले की अटक करण्यात आलेले आरएसएस कार्यकर्ते – प्रसाद आणि रथीश – पीडितेच्या मन्ननचेरी गावचे आहेत आणि हत्येमागील कथित कटात त्यांची भूमिका होती.

अटक केलेल्यांनी एसडीपीआय नेत्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांसाठी वाहनाची व्यवस्था केली होती. खून करणाऱ्यांसह इतर आठ जणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.तसेच, शानच्या हत्येचा बदला म्हणून रविवारी सकाळी मारल्या गेलेल्या भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.

अलप्पुझा शहरातील रंजितच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये १२ जण सहा दुचाकींवर त्यांच्या गल्लीत शिरताना दिसत आहेत. रंजितवर झालेला हल्ला अनपेक्षित होता कारण ते राजकीय विरोधकांच्या हिटलिस्टमध्ये कधीच नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. अलाप्पुझा येथील दोन हत्यांच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे पोलीस प्रमुख अनिल कांत यांनी पुढील तीन दिवस राज्यभरात सतर्कता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांची तपासणी केली जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक पोलिस ठाणी उभारली जातील. पुढील तीन दिवस मिरवणुका आणि लाऊडस्पीकरचा वापर प्रतिबंधित असेल.

दरम्यान, जिल्हा न्यायालयात वकील असलेल्या रंजित यांचे पार्थिव अलाप्पुझा येथील अरात्तुपुझा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी नेण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पक्षाच्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भाजपाने या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी सायंकाळी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक मंगळवारी पुढे ढकलण्यात आली. भाजपाने सांगितले की, मृत नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ही बैठक निश्चित करण्यात आली होती. हा त्यांचा अपमान आहे, असे पक्षाने सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर सांगितलं आहे.