British Couple Arrested: राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या दोन ब्रिटिश पर्यटकांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात पोस्टर लावल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोघांवरही व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अजमेरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश मीणा यांनी सांगितले की, लुइस गॅब्रियल डी (३६) आणि त्याची मैत्रीण अनुशी एम्मा क्रिस्टीन (३६) हे दोघे राजस्थानात पर्यटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी राजस्थानच्या अजमेर येथे वेगवेगळ्या जागांवर इस्रायल विरोधी आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पोस्ट चिकटवले. यानंतर जिल्हा पोलिसांच्या मदतीने हे पोस्टर हटविण्यात आले.

या ब्रिटिश नागरिकांनी राजस्थानच्या पुष्कर येथेही पोस्ट चिकटवले होते. पुष्करमध्ये मोठ्या संख्येने इस्रायली पर्यटक येत असतात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी दरवर्षी १० ते १२ हजार इस्रायली पर्यटक भेट देतात. सध्या पुष्करमध्ये जवळपास २००० इस्रायली पर्यटक आहेत.

दोन्ही ब्रिटिश पर्यटकांविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्याविरोधात ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.

२१ जानेवारी रोजी स्थानिक अधिकाऱ्यांना राजस्थानमध्ये विविध ठिकाणी स्टिकर्स चिकटवल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याची चौकशी करण्यासाठी सीआयडी पथक नेमण्यात आले. सीआयडीने म्हटले की, अशाप्रकारचे स्टिकर्स लावणे हे गंभीर तर आहेच, शिवाय यातून पर्यटकांच्या व्हिसा नियमांचेही उल्लंघन झाले आहे.

पोलीस अधीक्षक राजेश मीणा म्हणाले की, भारतीय भूमीवर असताना इतर राष्ट्रांचा अनादर करण्याच्या कृतींमध्ये सहभागी होणे, हे व्हिसा नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.