आगरतळा : त्रिपुरातील भारत- बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) गस्ती पथकावर ‘एनएलएफटी’च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक उपनिरीक्षक आणि जवान शहीद झाले.

नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) ही बंदी घालण्यात आलेली संघटना आहे. त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जवान आणि दहशतवाद्यांत चकमक उडाली.  दहशतवाद्यांनी हल्ला चढवताच जवानांनी त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले. आर. सी. नाथ सीमा चौकीजवळ हा संघर्ष झाला. हा भाग पानीसागर क्षेत्राच्या चावमनू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.  त्रिपुराची राजधानी आगरतळापासून धलाई ९४ किलोमीटरवर आहे. चकमकीदरम्यान उपनिरीक्षक भारूसिंग आणि जवान राजकुमार हे गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू ओढवला. घटनास्थळी आढळेल्या रक्ताच्या डागांवरून चकमकीत दहशतवादीही जखमी झाले असावेत असे दिसते, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली.