कोलकाता, नवी दिल्ली : भारत- बांगलादेश सीमेवर पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात गुरांची तस्करी करताना शुक्रवारी पहाटे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन बांगलादेशी ठार झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा पोलिसांनी असा दावा केला की, या चकमकीत तीन जण ठार झाले आहेत. त्यात एका भारतीयाचाही समावेश आहे. सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून तृणमूल काँग्रेसने सीमा सुरक्षा दलाच्या कार्यकक्षेवर प्रश्न उपस्थित केला असून कार्यकक्षा ओलांडली,  त्यामुळेच ही घटना घडली असल्याचे म्हटले आहे.

पहाटे दोनच्या सुमारास सीमेवर दोन्ही बाजूने सुमारे ८० समाजकंटक जमले होते. त्यांनी गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला.  सीमा सुरक्षा दलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हल्ला केला, असे सीमा  सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक वाय. बी खुराणिया यांनी सांगितले.